' नटसम्राट' बाबी कलिंगण उद्यानाचा वर्धापनदिन उत्साहात
कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील जांबरे गाव आजही जपतोय त्यांच्या स्मृती
ओटवणे प्रतिनिधी
स्वर्गीय नटसम्राट बाबी कलिंगण यांनी घाटमाथ्यावरील चंदगड तालुक्यातील ज्या गावात आपला देह ठेवला त्या जांबरे गावात मंगळवारी रात्री त्यांचा ११ वा स्मृतिदिन त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याच कंपनीचे नाटक सादर करून यादगार केला. तसेच त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ जांबरेवासियांनी साकारलेल्या "बाबी कलिंगण उद्यान" उद्यानाचा अकरावा वर्धापनदिन सोहळाही उत्साहात साजरा केला.दशावतार नाट्यकलेतील तारा म्हणजेच नटवर्य नटसम्राट स्वतः मालक अर्थात बाबी कलिंगण ! अकरा वर्षांपूर्वी त्यांनी जांबरे गावात देह ठेवला. तेव्हापासून कलिंगण कुटुंब व जांबरे गावाचे अतुट नातं आहे. याच अनोख्या नात्यातून जांबरेवासिय गेली ११ वर्षे त्यांचा स्मृतिदिन आणि त्यांच्या नावे साकारलेल्या उद्यानाचा वर्धापन दिन न चुकता भव्य दिव्य असा साजरा करतात.यावेळी "बाबी कलिंगण उद्याना" चा ११ वा वर्धापनदिन सोहळा जांबरेवासिय आणि कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यानंतर जांबरे गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात कै बाबी कलिंगण यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे तसेच कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे सिद्धेश कलिंगण, काका कलिंगण, राजू कलिंगण,प्रतीक कलिंगण, बाबली नाईक, संजय लाड, सुनिल खोर्जूवेकर,आशिष तवटे, चंद्रकांत खोत,या सर्वांचा जांबरे वासियांच्यावतीने यथोचित गौरव करण्यात आला. दशावतार कला कोकणातील असूनही या कलेचा घाटमाथ्यावर झालेल्या या सन्मानाने कोकणातील सर्व कलाकार भारावून गेले.यावेळी स्व. बाबी कलिंगण यांचे नातू सिध्देश सुधीर कलिंगण म्हणाले, स्व. बाबी कलिंगण यांच्या पश्चात आपले वडील कै लोकराजा सुधीर कलिंगण यांनी निर्माण केलेले कलिंगण कुटुंबीय आणि जांबरेवासिय यांचे अतूट नाते असेच पुढे सुरू राहण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी जांबरे माजी सरपंच भागोजी गावडे यांनी जांबरे परिसरातील सर्व नाटय़प्रेमी, दशावतार कलाकार व कलिंगण कुटुंबाचे आभार मानले.त्यानंतर रात्री लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरूर) यांचा 'वेडा चंदन' हा दशावतार नाट्यप्रयोग झाला. या नाट्यप्रयोगाला जांबरे परिसरातील नाट्य रसिकांनी गर्दी केली होती. रसिकांनी कलाकारावर बक्षिसांची खैरात केली.