‘पीएफआय’ हस्तकांवर देशभर छापे
महाराष्ट्र-कर्नाटकसह 13 राज्यांमध्ये 100 हून अधिक अटकेतः टेरर फंडिंगप्रकरणी एनआयए-ईडीची मोठी कारवाई
‘संशय’कल्लोळ...
- ‘पीएफआय’चे प्रमुख ओएमएस सलाम यांनाही अटक
- डिजिटल उपकरणे, मोबाईल, कागदपत्रे, रोकड जप्त
- ताब्यात घेतलेल्या संशयितांची एनआयकडून चौकशी
- पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
छापे पडलेली राज्ये : केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान.
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
टेरर फंडिग प्रकरणात देशभरात गुरुवारी पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आली. जवळपास 13 राज्यांमध्ये झालेल्या कारवाईत 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी करण्यात आली असून देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या छाप्यात अनेक डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. एनआयकडून ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशीही करण्यात आली. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत एनएसए अजित डोवाल, गृह सचिव अजय भल्ला आणि एनआयएचे महासंचालक उपस्थित होते.
देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आहेत. केरळमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छापेमारीमध्ये एनआयएसोबत ईडीचे अधिकारीही सहभागी झाले होते. बुधवारी रात्रीपासून सर्व राज्यांचे पोलीसही सक्रिय झाले होते. सायंकाळपर्यंत ‘पीएफआय’च्या 106 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले. तपास यंत्रणांनी अटक केलेल्यांमध्ये पीएफआय संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख ओएमएस सलाम आणि दिल्ली युनिटचे प्रमुख परवेझ अहमद यांचाही समावेश आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून ‘पीएफआय’वर आणखी व्यापक कारवाई होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. एनआयएच्या या छाप्यात पीएफआयच्या सर्व अधिकाऱयांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये पीएफआयचे अध्यक्ष ओएमएस सलाम यांच्या केरळमधील मांजेरी येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. हे छापे बुधवारी रात्री उशिरा सुरू झाले होते. दिवसभर ‘पीएफआय’च्या सर्व लहान-मोठय़ा कार्यालयांमध्ये शोधमोहीम घेण्यात आली. केरळबरोबरच आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. चौकशीच्या आधारे इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी मध्यरात्रीपासून 13 राज्यांमध्ये पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले.
केरळमधून सर्वाधिक 22 जण अटकेत
गुरुवारी सकाळपासूनच्या छाप्यांमध्ये केरळमधून सर्वाधिक 22 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 20-20 जणांना पकडण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, मध्य प्रदेशातून 4 आणि पुद्दुचेरीमधून 3 जणांना अटक केली आहे. याशिवाय तामिळनाडूमधून 10, उत्तर प्रदेशमधून 8 आणि राजस्थानमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर दहशतवादी शिबिरे आयोजित करणे, टेरर फंडिंग करणे आणि लोकांना धर्मांधता शिकवल्याचा आरोप आहे.
छाप्याच्या निषेधार्थ पीएफआय कार्यकर्ते रस्त्यावर
केरळमधील मल्लापुरम, तामिळनाडूतील चेन्नई, कर्नाटकातील मंगळूर येथे एनआयए, ईडीच्या छाप्यांविरोधात पीएफआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. केरळमध्येही कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला, त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करावा लागला. संघटनेचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पीएफआयने निवेदन जारी केले आहे. केंद्रीय यंत्रणा आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप करत पीएफआयने शुक्रवारी केरळमध्ये एक दिवसीय संप पुकारला आहे.
2007 मध्ये स्थापना, 20 राज्यांमध्ये विस्तार
पॉप्युलर प्रंट इंडियाची (पीएफआय) स्थापना 2007 मध्ये मनिथा नीती पसाराय (एमएनपी) आणि नॅशनल डेव्हलपमेंट फंड (एनडीएफ) नावाच्या संस्थेने केली होती. सुरुवातीला ही संघटना केवळ दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कार्यरत होती, परंतु आता ती उत्तर प्रदेश-बिहारसह 20 राज्यांमध्ये विस्तारली आहे. ही संघटना स्वतःला एक धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून वर्णन करते. परंतु देशातील अनेक हत्या आणि दहशतवादी घटनांशी तिचा संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. एवढेच नाही तर उदयपूरमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील केमिस्टच्या हत्येतही या संघटनेचे नाव आले होते. परंतु पीएफआय अशा प्रकरणांमध्ये कोणताही सहभाग नाकारत आहे.
छापासत्रानंतर अमित शहा-अजित डोवाल चर्चा
पीएफआय संघटनेवर 13 राज्यांमध्ये छापे टाकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरि÷ सुरक्षा अधिकारी, तपास यंत्रणांचे काही प्रमुख उपस्थित होते. पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटना एसडीपीआयवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोणते पुरावे सापडले आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. तसेच आता भविष्यात या संघटनेच्या विरोधात कोणता कठोर निर्णय घ्यायचा याचे नियोजन सरकार करत आहे.
छापेमारीमागील कारणे...
- टेरर फंडिंग : एनआयए अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळसह कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि हैदराबादमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात टेरर फंडिंग करण्यात आले आहे. सदर लिंक तपासल्यानंतर तपास यंत्रणेने छापे टाकले आहेत.
- प्रशिक्षण शिबिरे : पीएफआयने गेल्या काही महिन्यांपासून अनेक राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच सहभागींचे ब्रेनवॉशही केले जात होते. तसेच दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा संशयही आहे.
- फुलवारी शरीफची लिंक : पाटण्याजवळील फुलवारी शरीफमध्ये जुलैमध्ये सापडलेल्या दहशतवादी मॉडय़ूल कारवाईत पीएफआयच्या सदस्यांकडून ‘इंडिया 2047’ नावाचा सात पानी दस्तऐवज सापडला होता. त्यात येत्या 25 वर्षात भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याची योजना होती.