For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : गडहिंग्लज नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; मंत्री हसन मुश्रीफ यांचा गड कायम

05:25 PM Dec 21, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   गडहिंग्लज नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय   मंत्री हसन मुश्रीफ यांचा गड कायम
Advertisement

                          गडहिंग्लजवर राष्ट्रवादीची पकड अधिक मजबूत

Advertisement

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेसाठी झालेल्या नगराध्यक्षासह 23 जागेची मतमोजणी आज सकाळी पार पडली असुन अनेकांचे अंदाज धुळीस मिळवत मंत्री मुश्रीफ यांनी गडहिंग्लजचा ‘गड’ जिंकला आहे. राष्ट्रवादीला घवघवीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ यांच्यासह 18 जागेवर यश मिळाले असुन जनता दल, भाजपा, जनसुराज्य आणि शिवसेनेच्या महायुतीला केवळ 5 जागेवर मोजकेच यश मिळाले. या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर उबाठा शिवसेनेला खाते खोलण्यात अपयश आले असुन बोलबाला असणाऱ्या भाजपलाही केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्यासह या पक्षाचे एकूण 3 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल घोषीत होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल, फटाका उधळत मोठा जल्लोष केला. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पॅनेल केले होते. तर मंत्री मुश्रीफ यांना रोखण्यासाठी भाजपा, शिवसेना, जनसुराज्य या राज्यातील सत्तेतील पक्षांनी जनता दलाबरोबर जात महायुती केली होती. सुरवातीच्या टप्यात राष्ट्रवादीला एकतर्फी वाटणारी निवडणुक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजी पाटील यांनी महायुतीसाठी केलेल्या दौऱ्यामुळे चुरशीची वाटू लागली. चुरस रंगणार असे वाटत असताना गडहिंग्लज शहरातील मतदारांनी विरोधकांना धक्का देत मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलला घवघवीत यश दिले.

Advertisement

23 पैकी 18 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या असुन विरोधी महायुतीला केवळ 5 जागेवर समाधान मानावे लागले. महायुतीतून निवडून आलेल्या 5 जागेमध्ये जनता दलाला 3 तर जनसुराज्य, भाजपा यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. शिवसेनेने दोन जागा लढवल्या होत्या पण दोन्ही जागांवर अपयश मिळाले आहे. केवळ एका मताने शिवसेनेचे उमेदवार दुंडाप्पा नेवडे यांना पराभव पत्करावा लागला. उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे यांच्या पत्नी श्रध्दा शिंत्रे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांची पत्नी स्वाती चौगुले या राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे गडहिंग्लज शहरातील प्रमुख नेते माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांचा जनता दलाचे नवखे उमेदवार संजय रोटे यांनी धक्कादायक पराभव केला आहे.

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसुचित जातीसाठी राखीव होते. 6 उमेदवार रिंगणात उभारले होते. ऐनवेळी राष्ट्रवादीने महेश तुरबतमठ यांना उमेदवारी दिली. श्री. तुरबतमठ हे नशिबवान ठरले असून 12 हजार 350 मते मिळवून विजयी झाले आहेत. जनसुराज्यचे उमेदवार, माजी नगरसेवक गंगाधर हिरेमठ यांना 8 हजार 56 इतकी मते मिळाली आहेत. वंचित आघाडीचे प्रकाश कांबळे यांना 468, अपक्ष विनोद बिलावर यांना 792, विरसिंग बिलावर यांना 268, सचिन साबळे 89 मते मिळाली आहेत. नोटाला 164 मते नागरीकांनी दिले आहेत. माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, बसवराज खणगावे पुन्हा विजयी झाले आहेत. मावळत्या सभागृहाचे नितीन देसाई, रुपाली परीट, नरेंद्र भद्रापुर, स्वाती कोरी, बसवराज खणगावे हे पुन्हा विजयी झाले आहेत. तर मावळत्या सभागृहातील नगरसेवक श्रध्दा शिंत्रे, शकुंतला हातरोटे, राजेश बोरगावे, सुनिता पाटील यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, किरण कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. संपुर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग 9 ब मध्ये राष्ट्रवादी युवाचे शहराध्यक्ष रामगोंड उर्फ गुंड्या पाटील यांनी 897 अशा मोठ्या फरकाने रमेश रिंगणे यांचा पराभव केला आहे.

तर प्रभाग 8 मधून राष्ट्रवादीचे महेश सलवादे यांनी विक्रमी 1 हजार 155 मतांनी भिमराव कोमारे यांचा पराभव केला. शिवराज संस्थेचे सचिव अनिल कुराडे यांच्या पत्नी बिनादेवी कुराडे यांनी विजयी मिळवत सभागृहात प्रवेश केला. रूपाली परीट आणि उदय परीट या पती-पत्नी यांनी वेगवेगळ्या प्रभागात राष्ट्रवादीकडून उभे रहात विजय खेचून आणला आहे. तर संतोष चिकोडे यांनी जवळचे नातेवाईक सिध्दार्थ गाताडे यांचा पराभव केला.

गडहिंग्लज शहरातील एकूण 30 हजार 161 मतदारापैकी 22 हजार 187 मतदान झाले होते. निवडणुक प्रक्रियेमुळे गडहिंग्लजला दोन टप्यात मतदान झाले. प्रभाग 3 अ साठी काल शनिवारी मतदान घेण्यात आले. आज पॅव्हेलियन हॉल येथे निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली 11 टेबलवर मतमोजणी करण्यात आली. दुपारी 12 पर्यंत संपुर्ण निकाल जाहीर झाला होता. सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा मुख्याधिकारी देवानंद ढेकळे आणि नायब तहसिलदार विष्णू बुट्टे यांनी मतमोजणीसाठी मदत केली. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाका, गुलाल उधळुन शहरात मोठा जल्लोष केला. जेसीबी मधून गुलाल आणत विजय उत्सव साजरा केला. शहरात निवडणुक निकाल आणि मिरवणुका या पार्शभुमिवर उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, पोलिस निरिक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उशीरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या.

पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी- नगराध्यक्ष
राष्ट्रवादी- 17 नगरसेवक
महायुती - 5 नगरसेवक (जनता दल 3, भाजपा 1, जनसुराज्य 1)
चौकट.....
केवळ एका मतांनी
प्रभाग 10 मधील इतर मागास पुरुषासाठी झालेली लढत लक्षवेधी ठरली. याठिकाणी विठ्ठल भम्मानगोळ यांनी केवळ एका मतांनी विजय मिळवला आहे. श्री. भम्मानगोळ यांना 903 तर शिवसेनेचे दुंडाप्पा नेवडे यांना 902 मते मिळाली आहेत. एका मताची किंमत याची चांगलीच चर्चा शहरात होताना दिसत होती. मंत्री मुश्रीफ यांनी विजयी सभेत याचा उल्लेख केला.

Advertisement
Tags :

.