कोकणात राष्ट्रवादी फुंकणार प्रचाराचे रणशिंग! अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी चिपळूण सज्ज
शरद पवारही उद्या दौऱ्यावर; ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’च्या मुकाबल्याकडे सर्वांचे लक्ष
चिपळूण प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा 21 रोजी रायगडमधील श्रीवर्धन नंतर चिपळुणात येत आहे. सायंकाळी 4 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होत असून या यात्रेतून राष्ट्रवादी कोकणात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेही 22 सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या चिपळूण दौऱ्यावर येत असल्याने कोकणात राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशा रंगणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पवार काका-पुतणे’ यांनी कोकणातील चिपळूण-संगमेश्वर व रायगडमधील श्रीवर्धन या दोन विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात सुरू केलेली जनसन्मान यात्रा शनिवारी कोकणात आणि विशेषत: श्रीवर्धन व चिपळूण मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहे. श्रीवर्धन येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुपारी 3 वाजता सावर्डे येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ठिकठिकाणी स्वागत, सत्कार स्वीकारत ते 3.35 वाजता बहाद्दूरशेखनाका येथे येतील. त्यानंतर तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार, दुचाकी रॅलीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापर्यंत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार, नंतर श्री भैरी देवस्थानला भेट देऊन सायंकाळी 4.30 वाजता जाहीर सभेत लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत.
जाहीर सभेनंतर माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांच्या शिवसेना कार्यालयात स्वागत, स्व. नाना जोशी यांच्या निवासस्थानी, 6.25 वाजता मुस्लीम समाजाच्या सभागृहाला भेट देणार असून 7 वाजता महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बागायतदार, शेतकऱ्यांसह विविध घटकांशी उपमुख्यमंत्री पवार हे चर्चा करणार असून ते येथेच मुक्कामाला राहणार आहेत. गेल्या 5 वर्षांत आमदार शेखर निकम यांनी आपल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात विकासकामांसाठी तबल 2 हजार 362 कोटीचा निधी आणला. मात्र यामध्ये त्यांना पावलोपावली मदत लाभली, ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. त्यामुळे निकम यांनीही अजित पवार यांची साथ सोडली नाही. शनिवारी जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी येथील राष्ट्रवादी सज्ज झाली आहे.