राष्ट्रीयत्व म्हणजे देशहिताला प्राधान्य देणारी सुस्पष्ट भूमिका
‘नेशन फर्स्ट’ पुस्तकाचे लेखक उदय माहुरकर यांचे प्रतिपादन
पणजी : राष्ट्रीयत्व म्हणजे भावनिक घोषणा नव्हे, तर सत्यावर आधारित, कर्तव्यप्रधान आणि देशहिताला प्राधान्य देणारी भूमिका आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील काही राजकीय निर्णय, इतिहास मांडणी आणि सामाजिक समीकरणांवर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे उदय माहुरकर यांनी सांगितले. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात विविध विचारप्रवर्तक सत्रांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
कांपाल पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर बुधवारपासून सुरु झालेल्या या पाच दिवसीय महोत्सवात काल गुरुवारी दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार व लेखक उदय माहुरकर यांच्या नेशन फर्स्ट या पुस्तकावर आधारित विशेष संवाद सत्र पार पडले. http://'My Idea of Nation First : Redefining Unalloyed Nationalism'या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने झालेल्या या चर्चासत्रात वेदांता अगरवाल यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून लेखकांशी संवाद साधला. ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना नेमकी काय सांगते, ती केवळ घोषणांपुरती मर्यादित आहे की तिचा व्यापक आशय आहे, यावर सविस्तर मंथन करण्यात आले.
इतिहासाकडे निर्भीड दृष्टीने पाहणे आवश्यक
या पुस्तकात मांडलेल्या भूमिकेनुसार, ‘आत्मपरीक्षण न करणारा राष्ट्रवाद हा कमकुवत ठरतो’, असे मत माहुरकर यांनी व्यक्त केले. इतिहासाकडे केवळ भावनिक किंवा राजकीय सोयीने पाहण्याऐवजी, वस्तुनिष्ठ आणि निर्भीड दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: स्वातंत्र्यानंतरच्या काळात राबविण्यात आलेल्या काही धोरणांमुळे राष्ट्रीय एकात्मतेवर विपरीत परिणाम झाला, अशी मांडणी पुस्तकात करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही धोरणे अल्पसंख्याक हितसंबंधांच्या नावाखाली राजकीय फायद्यासाठी वापरली गेली, ज्यामुळे समाजात दरी निर्माण झाली, असा दावा पुस्तकात मांडण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी सर्व समुदायांना सामावून घेणाऱ्या समावेशक राष्ट्रवादाची संकल्पनाही लेखकाने मांडली असल्याचे स्पष्ट केले.
सांस्कृतिक आत्मविश्वास असलेली सभ्यता आधुनिक आव्हानांना अधिक सक्षमपणे सामोरी जाऊ शकते. संरक्षण, स्वदेशी तंत्रज्ञान, नवोन्मेष, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्व बाबी ‘नेशन फर्स्ट’ या विचारधारेचा भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सत्राला विद्यार्थी, वाचक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तकातील मांडणीवर वेगवेगळ्या मतप्रवाहांतून चर्चा होत असली, तरी विचारप्रवर्तक संवाद घडवून आणण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारच्या वैचारिक चर्चांमुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळत असून, केवळ पुस्तके विकत घेण्यापेक्षा पुस्तकांमागील विचार समजून घेण्याची संधी वाचकांना मिळत असल्याचे चित्र या सत्रातून स्पष्ट झाले.