राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी सोमवारपासून तीन दिवस संपावर
आज बँकांचे कामकाज सुरू राहणार
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी दि. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान संपावर जाणार आहेत. या संपामध्ये बेळगावमधील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनाही सहभागी होणार आहे. त्यामुळे बँकेवर आधारित व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाच दिवसांचे कामकाज करावे, जुनी पेन्शन स्कीम लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बँक कर्मचारी संपावर गेले होते. त्यावेळी बेळगावमध्ये फेरी काढून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या होत्या. परंतु सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने सोमवार दि. 28 रोजी संघटनेच्यावतीने बेळगावमध्ये रॅली काढली जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे पुन्हा धर्मवीर संभाजी चौक येथे रॅलीची सांगता होईल.
सोमवार दि. 28 ते बुधवार दि. 30 असे सलग तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. परंतु यामुळे आर्थिक व्यवहारांना फटका बसण्याची शक्यता आहे. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम अशा ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्या तरी इतर महत्त्वाच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी बँका सुरू असणे आवश्यक असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम आर्थिक व्यवहारांना बसणार आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांकडून आपल्या ग्राहकांना मोबाईल मेसेजद्वारे संपाबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आज बँका राहणार सुरू
शनिवारी चौथा शनिवार, रविवारी साप्ताहिक सुटी व सलग तीन दिवस संप यामुळे नागरिकांची गैरसोय होणार होती. यासाठीच रविवार दि. 27 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या दैनंदिन वेळेप्रमाणे बँका सुरू राहणार आहेत. यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी रविवारी आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.