राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा बेंगळूरात
वृत्तसंस्था / बेंगळूर
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणारा भारताचा मल्ल अमन सेहरावत याच्यासह अन्य महत्वाचे मल्ल येथे होणाऱ्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा 6 ते 8 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार असून बेंगळूर शहराला पहिल्यांदाज वरिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेमध्ये अमन सेहरावत तसेच 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेतील चॅम्पियन मल्ल अंतिम पांघल, 2019 च्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेतील रौप्यपदक विजेतला मल्ल दीपक पुनिया, 23 वर्षांखालील वयोगटातील विश्व कुस्ती महिलांच्या स्पर्धेतील चॅम्पियन मल्ल रितीका हुडा, ऑलिम्पियन मल्ल सोनम मलिक, राधिका, मनीषा बनवाला, बिपाशा, प्रिया, उदित, चिराग, सुनीलकुमार, नरिंदर चिमा आदी मल्ल सहभागी होत आहेत. सदर स्पर्धेमध्ये अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनशी संलग्न असलेल्या विविध राज्यांचे सुमारे 1 हजार मल्ल त्याचप्रमाणे रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन (आरएसपीबी), सर्व्हिसेस स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (एसएसपीबी) सहभागी होत आहेत. सदर माहिती अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. ही स्पर्धा बेंगळूरमधील कोरमंगला इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.