महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज खात्याला राष्ट्रीय द्वितीय पुरस्कार

10:52 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीज वितरणातील पाच निकषांवर निवड : राष्ट्रपतींकडून वीजमंत्र्यांनी स्वीकारला पुरस्कार

Advertisement

पणजी : वीज वितरण व्यवस्थेतील पाच आदर्श निकषांवर गोवा वीज खात्याला राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. काल शुक्रवारी पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत वीजमंत्री  ढवळीकर यांनी ही माहिती दिली. संपूर्ण राज्यभरात वीज वितरण करत असतानाच लोकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करता यावा हेच ध्येय घेऊन वीज खाते वावरत असून याकामी त्यांना गोवा वीज विकास संस्थेचे सहकार्य लाभत असल्याचेही ढवळीकर यांनी पुढे सांगितले. भाऊसाहेब बांदोडकर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत 1965 ते 1971 या कालावधीत वीज वहन व्यवस्था उभारली. वीजवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे नंतरच्या सरकारांनी त्या बदलण्याचे काम हाती घेतले. त्याही पुढे जाताना अनेक भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या. त्यामुळे वितरणा दरम्यान होणारी वीज गळती व त्यायोगे होणारे नुकसान नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. सध्या 13 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान होत असून भविष्यात ही संख्या एकअंकी करण्याचे ध्येय ठेवले आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असे ढवळीकर म्हणाले.

Advertisement

गोव्यात वीज स्वस्त

अन्य राज्यांमध्ये 19 ऊपयेपर्यंत प्रती युनिट दराने वीज विकण्यात येते, तर तोच दर गोव्यात व्यावसायिक ग्राहकांसाठी केवळ 6.70 ऊपये आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आम्ही केवळ वीज खरेदी करून विकतच नाही, तर ती स्वस्तातील स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करून देत आहोत.

वीज खात्यातर्फे 2850 कोटींची विकासकामे

सध्या सुमारे 2850 कोटींची विकसाकामे वीज खात्याने हाती घेतली असून त्यात एचटी लाईन्सचे भूमिगत केबलिंग, उच्च दाबाच्या ओव्हरहेड लाईन्सचा दर्जा वाढविणे, एलटी लाईन्सचाही दर्जा वाढविणे तसेच भूमिगत करणे यासारख्या कामांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय सबस्टेशन्सचा दर्जा वाढविण्याचे कामही हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी नवीन सबस्टेशन्स उभारणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे, फोंडा, वेर्णा येथे उच्च क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर्स बसविणे यासारखी कामेही सुरू करण्यात आली आहेत. त्यायोगे वीज वितरणाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत, असे ढवळीकर यांनी सांगितले.

वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न

राज्यात होणारी वीज चोरी अडविणे हा प्रमुख उद्देश असून त्यादृष्टीने गावोगावी ट्रान्स्फॉर्मच्या ठिकाणी मीटर बसविण्याचे काम हाती घेतले असून अनेक ठिकाणी असे मीटर बसविण्यातही आले आहेत. त्यानंतर वितरणातील खर्च आणि कमाई यांचा ताळमेळ जुळविणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.

वीज निर्मिती करण्याचेही प्रयत्न

हे सर्व काम पाहता केंद्र सरकारने जे निकष लावून राज्याला द्वितीय पुरस्कार दिला त्याचे सर्व श्रेय आपण खात्यातील अधिकारीवर्गाला देतो. असा पुरस्कार मिळाल्याने आम्हाला नवीन उर्जा, स्फूर्ती मिळाली असून त्याच उत्स्फूर्ततेने काम करताना भविष्यात राज्यात वीज निर्मिती करण्याचेही प्रयत्न होतील. त्यादृष्टीने अधिकारी कार्यरत होतील, असे ढवळीकर यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून राज्याला प्राप्त झालेला सर्व निधी वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे, त्यामुळे यासंबंधी विपरित अर्थाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर विश्वास ठेऊ नये, असेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article