राष्ट्रीय पदक विजेती सई चाळकेची लक्षवेधी गगनभरारी...!
राष्ट्रीय स्तरावर उमटवली मोहर, इ. 6वीपासून दाखवतेय कौशल्याची चुणूक, पदकांची लयलूट
राजू चव्हाण / खेड
कोणतेही यश हे सहजगत्या मिळत नसते. त्यासाठी कठोर मेहनत असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण ध्येयपूर्ती साध्य करू शकत नाही. परंतु काहीजण असे असतात की, आपले ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र झटत असतात. तायक्वाँदो क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील सई संतोष चाळके हिने तायक्वाँदो क्षेत्रात घेतलेली लक्षवेधी गगनभरारी साऱ्यांना थक्क करायला लावणारी आहे. दक्षिण कोरिया या देशाचा राष्ट्रीय खेळ असलेला तायक्वाँदो खेळ 1988 सालापासून ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात नियमित खेळला जात आहे. दिवसेंदिवस या खेळाची व्याप्तीही वाढत आहे. खेडोपाड्यांमध्येही खेळाचे महत्त्व वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या खेळाचे महत्त्व लक्षात घेत सई हिने आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. आपल्या नावाबरोबरच प्रशालेचे पर्यायाने तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवण्याची किमया साधली आहे.
भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. 10वीच्या वर्गात सई शिकत आहे. इ. 5वीपर्यंतचे शिक्षण द कॅब्रिज इंटरनॅशनल स्कूल येथे पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी रोटरी स्कूलचा पर्याय निवडला. इ. 6वीपासून आजतागायत अभ्यासासह तायक्वाँदो खेळाची आवड जोपासत कौशल्याची चुणूक दाखवत आहे. लहानपणापासूनच प्रत्येक कार्यात सक्रिय असल्याचे पालकांच्या निदर्शनास येताच तिला करिअरसाठी नियमित प्रोत्साहन दिले. प्रत्येक यशामागे कोणीतरी प्रेरणा होणे महत्त्वाचे असते. सईच्या यशामागे रोटरी स्कूलचे तायक्वाँदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण हे महत्त्वपूर्ण ठरतात. सईने कोणत्यातरी खेळात नशीब आजमावावे अशी तिच्या पालकांची मनापासून इच्छा होती. त्यानुसार कृणाल चव्हाण यांच्याकडून तायक्वाँदो खेळाचे रोटरी स्कूलच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. तायक्वाँदोमधील बारकावे ती सहजपणे कमी कालावधीत आत्मसात करू लागली. त्यानंतर ती प्रत्यक्षात स्पर्धांमध्येही सहभागी होऊ लागली.
2020 मध्ये तायक्वाँदो खेळात सहभागी झाल्यानंतर कोरोनाकाळ असल्याने खेळात प्रगती करणे आव्हानात्मकच बनले होते. परंतु तिने हार न मानता ऑनलाईन प्रशिक्षण चालू ठेवत तायक्वाँदोमधील आपल्या आवडीला खंड पडू दिला नाही. 2021 मध्ये तिच्या आयुष्यातील पहिली जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धा खेळली. या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात तिने रौप्य पदकाला गवसणी घातली. रौप्यपदकावर तिने मोहर उमटवल्यानंतर तायक्वाँदो खेळातील तिचा उत्साह बघून पालकांनी तिला खेळासाठी विशेष आधार अन् पाठिंबा दिला.
त्यानंतर उत्तरोत्तर तिने अनेक स्पर्धा खेळल्या. आतापर्यंत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदकांची अक्षरश: लयलूटच केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील 17 हून अधिक पदके तिच्या पदरी आहेत. बंगलोर येथील सीबीएसई विभागीय चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक, गाझियाबादच्या सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, तालुकास्तरीय स्कूल गेम स्पर्धेत सुवर्ण, जिल्हास्तरीय स्कूल गेम स्पर्धेत रौप्य, बेळगाव विभागीय स्पर्धेत कांस्य, राज्यस्तरावरील निवड स्पर्धेत सुवर्णपदक, मुंबई येथील राज्यस्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग, डेरवणच्या जिल्हास्तर स्पर्धेत रौप्य, चिपळूण जिल्हास्तर चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक, राजापूर राज्यस्तर निवड स्पर्धेत रौप्य, तालुकास्तर स्पर्धेत सुवर्णपदक, शिर्डी सीबीएसई विभागीय चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सई चाळके हिने 2024 मध्ये उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्याचा मान मिळवला आहे.
तिच्या यशात तायक्वाँदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या उत्तम प्रशिक्षण व पाठिंब्यामुळेच ती आजघडीला तायक्वाँदोत राष्ट्रीय पदक विजेती ठरली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ती तायक्वाँदो खेळात उत्तरोत्तर प्रगतीही करत आहे. तिच्या आई-वडिलांनी केलेले सहकार्य अन् दिलेला पाठिंबा यामुळेच खेळामध्ये प्रगती करणे सहज शक्य झाल्याचे ती सांगते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवायचाय !
कोणताही खेळ हा शेवटपर्यंत आवडीने खेळला पाहिजे. जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असायला हवी. जिंकणे-हरणे हा खेळाचाच एक भाग आहे. त्यालाही सामोरे जायची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. जगाच्या कानाकोपऱ्यात खेळाचे नाव पोहचवायचे आहे. हेच ध्येय उराशी बाळगत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकिक प्राप्त करायचा आहे.
- सई चाळके, खेड.