राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून बायपासबाबत दिशाभूल
शेतकऱ्यांचा आरोप : इतर ठिकाणची वर्कऑर्डर दाखवून कामाला सुरुवात
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून हलगा-मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांनी बायपासच्या कामाबाबत वर्कऑर्डर मागितली असता त्यांना फिश मार्केट ते खानापूर या रस्त्याच्या रुंदीकरणाची वर्कऑर्डर दिली जात आहे. तर माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता समर्पक कागदपत्रे नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना धमकावत काम सुरू करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
हलगा-मच्छे बायपाससंदर्भात झिरो पॉईंट निश्चित न करताच बेकायदेशीररीत्या काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात काही शेतकरी न्यायालयात गेले असून अद्याप या खटल्याचा निकाल आलेला नसतानाच काम सुरू ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी अनगोळ शिवारात बायपासचे काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. वर्कऑर्डर न दाखविताच काम सुरू ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी आलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या.
जानेवारी 2026 मध्ये शेतकरी सुभाष लाड यांनी माहितीच्या अधिकाराखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्कऑर्डरची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून त्यांना उत्तर पाठविण्यात आले असून त्यामध्ये या प्रश्नाला समर्पक कागदपत्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फिश मार्केट ते खानापूर रोड या 9 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची वर्कऑर्डर दाखवून दिशाभूल केली जात आहे.
जोवर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोवर हलगा-मच्छे बायपासला विरोध सुरूच ठेवणार, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. ज्या भागामध्ये विरोध नाही त्या ठिकाणचे काम त्यांनी करावे. परंतु जे शेतकरी न्यायालयात गेले आहेत, त्यांच्या सर्व्हेनंबरमध्ये रस्त्याचे काम करू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.