‘नॅशनल हेरॉल्ड’ निवाडा तिसऱ्यांदा लांबणीवर
आता 16 डिसेंबरला निर्णय अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील निकाल दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने तिस्रयांदा पुढे ढकलला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यायची की नाही हे न्यायालय ठरवणार आहे. आता न्यायालय 16 डिसेंबर रोजी निकाल देणार आहे. सदर आरोपपत्रात सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची नावे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) दाखल आहेत.
ईडीने या नेत्यांवर मूळ नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणारी कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे. 14 जुलै रोजी युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने 29 जुलैपर्यंत निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर यासंबंधीची सुनावणी 8 ऑगस्ट आणि 29 नोव्हेंबर रोजी स्थगिती देण्यात आली होती.