नॅशनल हेरॉल्ड : गांधी परिवार अडचणीत
राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने या प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे विदेशातील अधिकारी सॅम पित्रोदा यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात सुमन दुबे आणि अन्य काही लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयात 25 एप्रिलला सुनावणी केली जाणार आहे.
हे प्रकरण मनी लाँडरिंगचे आहे. या प्रकरणी ईडीने संबंधित कागदपत्र आणि ओसीआर पुढच्या सुनावणीच्या वेळी सादर करावेत, अशा आदेश दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात ईडीने आधीच 64 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. असेच आणखी 750 कोटी रुपयांच्या मालमत्तेसंबंधीची कारवाई केली जात आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही संसद सदस्य असल्याने हे प्रकरण या विशिष्ट न्यायालयात चालविण्यात येत आहे.
केस डायरी सादर होणार
25 एप्रिलला पुढची सुनावणी होणार असून त्यावेळी ईडीला या प्रकरणाची केस डायरी न्यायालयात सादर करावी लागणार आहे. तसेच सरकारला अन्य पुरावे सादर करावे लागणार आहेत. या प्रकरणाची सुनावणी वेगाने झाली तर ते गांधी कुटुंबासाठी अडचणीचे ठरु शकते, असे अनेक कायदेतज्ञांचे मत आहे.
काय आहे हे प्रकरण...
हे प्रकरण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहे. तसेच ते नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र आणि एजेएल या कंपन्यांशी संबंधित आहे. गांधी कुटुंबातील सदस्य आणि काँग्रेसचे आणखी काही ज्येष्ठ नेते यांनी काँग्रेस पक्षाच्या निधीचा दुरुपयोग करुन एजेएल या कंपनीची संपत्ती आपल्या नावावर करुन घेतली, असा आरोप आहे. गांधी कुटुंबाने एजेएल कंपनीची संपत्ती आपल्या मालकीच्या यंग इंडियन्स या कंपनीच्या नावे हस्तांतरीत केली, असाही आरोप आहे. यंग इंडियन्स या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची 76 टक्के भागीदारी आहे. इतर 24 टक्के समभाग इतर नेत्यांचे आहेत. याचाच अर्थ असा की, या कंपनीची मालकी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे आहे.
2021 मध्ये चौकशीला प्रारंभ
या प्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) 2021 मध्ये चौकशीला प्रारंभ केला होता. तथापि, हे प्रकरण 2014 पासूनच गाजत आहे. त्यावर्षी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रम्हणियम स्वामी यांनी या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात गुन्हेगारी तक्रार सादर केली होती. एजेएल या कंपनीची 2 हजार कोटी रुपयांची मालमत्ता, गांधी कुटुंबाने यंग इंडियन्स या कंपनीच्या माध्यमातून केवळ 50 लाख रुपयांमध्ये आपल्या मालकीची केली होती, असा आरोप त्यांनी केला होता. नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचा प्रारंभ जवाहरलाल नेहरु यांनी अनेक स्वातंत्र्यसेनानीच्या समवेत 1938 मध्ये केली होती. या वृत्तपत्राने देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोठी भूमिका साकारली होती. पण आता हे वृत्तपत्र आणि त्याच्याशी जोडलेल्या कंपन्या आणि व्यक्ती यांची कोंडी झालेली आहे.