कोल्हापूरच्या 'वारसा' माहितीपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर!
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून घोषणा : मर्दानी खेळाच्या प्रचार-प्रसारावर आधारित माहितीपट, निर्माता सचिन सूर्यवंशींच्या कष्टाचे चीज, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
कोल्हापूर प्रतिनिधी
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. सर्वोत्तम कला, सांस्कृतिक चित्रपट या प्रकारात कोल्हापूरचे दिग्दर्शक व निर्माते सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटाला पुरस्काराने सन्मानित करत असल्याचे मंत्रालयाने जाहीर केले. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने कोल्हापूरच्या क्रीडाबरोबर सांस्कृतिक क्षेत्राचाही गौरव होणार आहे. देशभरातील विविध चित्रपट व माहितीपटांनाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लवकरच पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
क्रीडानगरी कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, हॉकी, क्रिकेट या खेळांचे मोठे वेड आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर देदिप्यमान यश मिळवतानाच कोल्हापूरच्या नावाचा डंका देशात आणि देशाबाहेर वाजवला आहे. कोल्हापुरात गेल्या सात ते आठ दशकांपासून मर्दानी खेळ म्हणजेच शिवकालीन युद्धकलेचे आखाडे नेटाने सुऊ आहेत. जुन्या पिढीप्रमाणेच आजची नवी पिढीही युद्धकला अवगत करत आहे. युद्धकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जणू वारसाच बिंबवण्याचे काम आखाड्यांचे वस्ताद करत आहेत. मूठभर मावळे हाती असूनही आणि गनिमी काव्याने युद्ध कसे जिंकता येते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्ध सामुग्रीतून दाखवून दिले आहे. हा सगळा पराक्रमी वारसा कोल्हापूरकर कसा जपताहेत हे वारसा या माहितीपटातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक व निर्माते सचिन सूर्यवंशी यांनी केला आहे.
माहितीपटाच्या निर्मितीसाठी सलग दोन वर्षे रिसर्च करत वारसा या माहितीपटाचे शूटिंगही केले जात होते. 25 मिनिटांचा हा माहितीपट आहे. यामध्ये मर्दानी खेळाच्या आखाड्यांचे वस्ताद व त्यांच्या शिष्यांच्या मुलाखतींना स्थान दिले आहे. शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकेही माहितीपटातून दाखवण्यात येत आहेत. माहितीपटाचे 75 टक्के चित्रीकरण हे मोबाईलच्या कॅमेऱ्यातून केले आहे. गेल्या 15 वर्षापासून फिल्म क्षेत्रात कार्यरत असलेले सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटाला 2022 सालीही फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला आहे. आता या माहितीपटाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने नियोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट कला-सांस्कृतिक चित्रपट या कॅटेगरीसाठी वारसा या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. वारसा हा माहितीपट युट्यूबवर उपलब्ध आहे. हा माहितीपट तयार करण्यासाठी सूर्यवंशी यांनी तब्बल तीस लाख ऊपये खर्च केला आहे. हा खर्च मिळालेल्या पुरस्काराने फलदायी ठरला आहे. सूर्यवंशी यांनी बनवलेल्या दी सॉकर सिटी या डॉक्युमेंटरीलाही 2019 साली फिल्मफेअर अॅवॉर्डने गौरवले आहे.