पणजीत 4 फेब्रुवारीपासून ‘राष्ट्रीय पुस्तक महोत्सव’
मांडवीतीरी पाच दिवसांचा ज्ञानसागर : 250 पुस्तक दालनांसह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स; लेखक, वाचक, प्रकाशक, विक्रेत्यांची महापर्वणी
पणजी : गोव्यात नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या सहकार्याने येत्या दि. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल पणजी येथे राष्ट्रीय स्तरावरील भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामुळे गोमंतकीयांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन तसेच दै. तरुण भारतचे समूहप्रमुख तथा सल्लागार संपादक आणि गोव्यातील या भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजक डॉ. किरण ठाकुर यांनी दिली. गोव्यातील या पहिल्याच अति भव्य पुस्तक महोत्सवात देशभरातील 250 पेक्षा अधिक पुस्तक विक्रेते आपापली दालने मांडणार आहेत.
मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. किरण ठाकुर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, निना नाईक उपस्थित होत्या. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेला अनेक प्रकारची पुस्तके आणि प्रख्यात व नामवंत साहित्यिक, लेखक, कवी यांचे विचारही ऐकायला मिळणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच देशातील नामवंत राजकीय नेते आणि विचारवंत आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार या पुस्तक महोत्सवात सहभागी होणार आहेत, असेही डॉ. किरण ठाकुर म्हणाले.
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे देशात काही महत्त्वाच्या ठिकाणी दरवर्षी पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले जाते. अलीकडेच पुणे येथे झालेल्या पुस्तक महोत्सवात लाखो पुस्तकांची विक्री झाली आणि त्या महोत्सवाला 8 लाख नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सुमारे 50 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली होती. गोव्याच्या पुस्तक महोत्सवात मोठ्या प्रमाणात गोमंतकीय वाचकवर्ग आपली हजेरी लावणार आहे. गोव्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील महोत्सवात सहभागी करुन घेतले जाणार आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शिक्षकवर्गही सहभागी होईल, असेही डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले.
महोत्सव ठरणार ज्ञान, मनोरंजनाचा खजिना
पणजीतील या महोत्सवात विविध दालने उभारण्यात येतील. उपस्थितांना काही नामवंत लेखकांना भेटता येईल. त्यांचे विचारही ऐकता येईल. एका मोठ्या व्यासपीठावर दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. दुसऱ्या व्यासपीठावर साहित्यिक विचारांची मेजवानी प्राप्त होईल. याशिवाय मुलांसाठी वेगळे दालन उभारले जाईल. त्यात बालनाट्या, बालकथा तसेच मुलांना बौद्धिक खाद्य प्राप्त होईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. या व्यतिरिक्त गोव्यातील मराठी, कोकणी, इंग्रजी साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचे विचारही ऐकण्याची संधी प्राप्त होईल. गोमंतकीय साहित्यिकांच्या सेवेचा विचार करून त्यांचा सन्मानही केला जाईल. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने बाजूच्या परिसरात अन्न महोत्सवाचे देखील आयोजन केले जाईल. ज्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शिवाय गोमंतकीय खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल, अशी माहिती डॉ. किरण ठाकुर यांनी दिली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गेले दोन महिने अनेक कार्यकर्ते प्रत्यक्षात राबत आहेत. या महोत्सवासाठी केंद्र सरकार तसेच केंद्रातील शिक्षण खाते, गोवा सरकार, त्याचबरोबर पुणे येथील समर्थ युवा फाऊंडेशन, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन हे सहआयोजक आहेत.
एनबीटीचे चेअरमन मिलिंद मराठे, तसेच संचालक युवराज मलिक यांनी गोव्यातील बुक फेस्टिव्हलसाठी शिस्तबद्धरित्या कामाची दिशा देखील निश्चित केली आहे. डॉ. किरण ठाकुर यांच्यावर त्यांनी गोव्यातील आयोजनासाठीची विशेष जबाबदारी सोपविली आहे. एनबीटीचे गोव्याचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून प्रा. भूषण भावे हे कार्य पाहत आहेत. गोव्यातील तमाम जनतेला महोत्सवात सहभागी करून घेतले जाणार असून गोव्यातील सर्व सामाजिक संस्थांनी या पुस्तक महोत्सवासाठी आपले योगदान अवश्य द्यावे, असे आवाहन किरण ठाकुर यांनी केले आहे. पुस्तक महोत्सवाचे अधिकृत कार्यालय अलीकडेच गोव्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस) यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा इमारतीच्या तळमजल्यावरील गोमंतक साहित्य सेवक मंडळ सभागृहात हे कार्यालय कार्यान्वित आहे. ‘गोवा वाचत आहे’ अशा संकल्पनेखाली पुस्तक वाचन करत असतानाच्या फोटोंचे प्रदर्शन महोत्सवात भरण्यात येणार आहे. त्यासाठी वाचकांनी 29 जानेवारी पूर्वी स्वत: पुस्तक वाचन करतानाच फोटो पाठवावा, असेही आवाहन आयोजकानी केले आहे.