आधी राष्ट्रकारण
शनिवारी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे प्रमख नेते अमित शहा यांनी शिवपुण्यतिथीचा योग साधून रायगडावर हजेरी लावली आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करुन भाजप आघाडी शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन देशात आणि राज्यात कारभार करते आहे. 2048 साला पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत जगातली प्रथम क्रमांकाची अर्थशक्ती व महाशक्ती होईल आणि शिवछत्रपतीचे आम्ही स्वप्न साकारु असे सांगून गेले. या समारंभाला छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. त्यांनी शिवछत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकापासून शिवछत्रपती व महापुरुषाबद्दल अवमानकारक भाषा, वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्यासाठी कायदा अस्तित्वात आणावा अशी मागणी केली.खरच हा कायदा झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तसे झाले तर महापुरुषांना जातीशी जोडून राजकीय व्होट बँका फुगवणाऱ्यांना चाप बसेल यात शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श, आणि कार्यपद्धती हेच आपल्या सरकारचे धोरण असे म्हणत जर कुणी शिवछत्रपतांचा वा महापुरुषांचा अवमान केला तर त्याला टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा तरतूद करु असे वक्तव्य केले. गेले काही वर्षे राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य याचा डंका वाजवत काही मंडळी स्वत:ची पोळी भाजताना दिसत होती. काहींनी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यापर्यंत तारे तोडले होते. जो तो स्वत:ला इतिहास तज्ञ समजून हवे ते बोलताना दिसत होता. आणि यांचा गैरफायदा घेऊन समाजमन अस्थिर केले जात होते.अलीकडे जगात कुठेही काही झाले तर वाडी वस्तीवरचे लोक रिअॅक्ट होतात. व निवेदने देतात, मत मांडतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात. मध्यंतरी एका गावचे सरपंच जिल्हाधिकारी यांना भेटायला पाच सात जणांचे शिष्टमंडळ घेऊन आले होते. तीन तास बसून होते. नंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांना आत बोलवताच कॅमेरा सुरु झाला आणि निवेदन वगैरे दिले. सगळे स्थानापन्न झाले आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन वाचून विचारले या निवेदनाचा व तुमच्या गावाचा संबंध काय? निवेदन जगातल्या एका छोट्या मुस्लिम देशाबद्दल होते. तेथे महिलांना बुरखा व अन्य गोष्टींबद्दल त्रास होत होता. तो थांबवावा अशी मागणी होती.जिल्हाधिकारी म्हणाले या देशाला तुमच्या पैकी कुणी गेले आहे का? तर उत्तर आले नाही. तेथे कोण प्रमुख आहेत माहिती आहे का? तर नाही. तुमच्या गावातील, ओळखीतले कुणी तेथे गेले किंवा आहे का? नाही. मग या निवेदनाचा हेतू? सगळे गप्प. एक जण म्हणाला फेसबुकवर फोटो टाकायला. बर असतं सगळे हसले. पण जिल्हाधिकारी भडकले. म्हणाले, तुमच्या गावाचे अनेक प्रश्न आहेत शाळा, रस्ते, दवाखाना, पाणी व्यवस्था, शेतीच्या अनेक समस्या आहेत.मुलांची शाळेत उपस्थिती नसते, व्यसनाधिनता वाढते आहे. जातीयता वाढते आहे. त्यात लक्ष घाला. तंटामुक्त गाव, व्यसनमुक्त गाव, पर्यावरण रक्षण करणारे गाव असं काहीतरी काम करा.जिल्हाधिकारी यांनी सर्वाचे कान उघडले. आज तो किस्सा आठवयाचे कारण आपण निवडून दिलेले प्रतिनिधी काय करतात, त्यांची भाषा काय असते, सभागृहात ते कसे बोलतात, लोकांनी त्यांना निवडून दिले त्यांनां ते कितपत न्याय देतात हे सारे तपासण्याची वेळ आली आहे. खरे तर इतिहासाचा अभ्यास हा इतिहासातील चांगल्या गोष्टीची प्रेरणा आणि झालेल्या चूका परत होवू नयेत यासाठी करायचा असतो. पण यांचे भान कुणालाच राहिलेले नाही. प्रत्येक संताला आणि महाषुरुषाला जात चिकटवून जो तो राजकारण करु पाहतो.आधी राजकारण मग बाकीचे असा अजेंडा असतो. मग त्यासाठी काहीही केले जाते.अमित शहा यांचा दौरा झाल्यावर त्यांच्या भाषणातील किस काढला जातो आहे. महायुतीतील कुरबुरी ऐकू येत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी मागणी होते आहे. अमित शहा यांनी औरंगजेबाची कबर या ऐवजी औरंगजेबाची समाधी असा ओघात उल्लेख केला त्यावर टीका टिप्पणी केली जात आहे. ही कबर हटवावी त्याचे उदात्तीकरण थांबवावे अशी मागणी केली जात आहेच. पण ती उखडून फेकू असेही म्हटले जात आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्पही असेच वादात आहे. पहिली मुलीची शाळा कुणी काढली यावर नव्याने वाद सुरु झाला आहे.शिवाजी महाराजांचे गुरु कोण वगैरे वाद आहेतच. एकूण काय तर निव्वळ राजकारण आणि फक्त राजकारण. या राजकारणातून कुणीही संत, महापुरुष या नेत्यांच्या तावडीतून सुटलेला नाही.आणि हे होण्यामागे खरे कारण आपण सारे मतदार आहोत. आम्ही माणसं निवडून देताना त्याचे कर्तृत्व, निष्ठा, चारित्र्य, काम, कार्यपद्धती याचा फारसा विचार न करता त्यांची जात, गाव, धर्म, ओळख, त्यांने पांघरलेला बुरखा याला महत्त्व देतो. ओघानेच चांगली माणसे राजकारण, समाजकारण, सहकार या क्षेत्रांत फिरकत नाहीत. निवडणुकीत उमेदवाराला येणारे खर्च पाहिले तर निवडणूक लढवणे आणि निवडून येणे हे येरागबाळ्याचे काम नाही. तेथे जातदांडगा, अर्थदांडगा, आणि पोहचलेला उमेदवार हवा हे अधोरेखित होते. लोकशाही सावरायची असेल तर आपणच आपल्यात बदल केला पाहिजे. जोडीला महापुरुष, संत यांचा आदर्श घेऊन पुढं पाऊल टाकले पाहिजे. आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नव्हे विश्वाचे आहेत. त्यांना अभिवादन करताना, शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक होताना, आधी राष्ट्रकारण असले पाहिजे. महापुरुषाबद्दल अवमानकारक, अपशब्द वापरले तर त्यावर कडक कारवाई करण्यासाठी संसदेत कायदा पास होईल, अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभा राहील पण महापुरुष व संतांना धरुन आम्ही राजकारण केव्हा थांबवणार हा सवाल मात्र कायम डिवचत राहील. आधी राष्ट्रकारण हा धडा आपण घेतला पाहिजे.