महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाथमहाराज म्हणतात सद्गुरुंनी ग्रंथ लिहून घेतला

06:26 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्ण हे वेदांचे जन्मस्थान आहेत. त्यांच्या मुखातून ह्या एकादश स्कंधाचे निरुपण झालेले असल्याने त्या निरुपणामध्ये सगळा वेदार्थ आपोआपच आलेला आहे. त्यामुळे येथे वेदार्थ अगदी माहेरी आल्यासारखा वाटतो. हा माहेरी आलेला वेदार्थ सर्व साधकांना सुखावून जातो. त्या सुखातून त्यांना स्वानंद गवसतो. दुधाच्या विरजणाला घुसळून काढून त्यातून लोणी काढतात त्याप्रमाणे वेदार्थशास्त्राचे मंथन करून म्हणजे तो अगदी घुसळून काढून व्यासांनी महाभारतरुपी नवनीत साधकांच्या हाती दिले आहे. त्या महाभारताचा मतितार्थ म्हणजे श्रीभागवत-हरिलीला होय. त्या भागवताचा सारांश म्हणजे भगवंतानी स्वत: प्रबोध केलेला परब्रह्मरस ह्या एकादश स्कंधात पुरेपूर आलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे यतीमध्ये परमहंस किंवा देवामध्ये जगन्निवास वंद्य आहेत त्याप्रमाणे हा एकादश स्कंधही वंद्य झालेला आहे. असेही म्हणता येईल की, पक्ष्यांमध्ये राजहंस किंवा रसामध्ये सिद्धरस श्रेष्ठ आहेत तसे भागवतातील स्कंधात परम सुरस असल्याने स्वानंदरूप असलेला एकादश स्कंध श्रेष्ठ आहे. तीर्थक्षेत्र वाराणसीला गंगेमुळे पावित्र्य आलेले आहे तसे हा एकादश स्कंध जीवाचा उद्धार करणारा असल्याने त्याचाही महिमा वाचेने सांगण्याच्या पलीकडचा आहे. एकादश स्कंधाचे महात्म्य सांगून झाल्यावर नाथमहाराज अत्यंत विनयाने सद्गुरूंनी हा ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला असं सांगून त्यांचे ऋण मान्य करतात. ते म्हणतात, एकादश स्कंधावरील टीका सद्गुरु जनार्दन महाराजांनी माझ्याकडून लिहून घेतली ती केवळ भाविकांना त्याचं फल मिळावं म्हणून. ज्याप्रमाणे वडील मुलाचा हात धरून त्याच्याकडून अक्षरे काढून घेतात त्याप्रमाणे एकादश स्कंधाचा अर्थ माझ्याकडून सद्गुरू जनार्दन महाराजांनी लिहून घेतला आहे. ग्रंथ कसा समजावून सांगावा, त्यांची मांडणी कशी करावी, इत्यादि गोष्टीबद्दल मी अज्ञानी होतो हे जाणून त्यांनी मार्गदर्शन करून हा ग्रंथ लिहून घेतला. हे जनार्दन स्वामिंनी घडवून आणलेले एक आश्चर्य होय. ग्रंथाला पारमार्थिक रूप प्राप्त करून दिले. भगवंताचे मनोगत मुळातच इतके गूढ आहे की, ते भल्याभल्या शास्त्रपारंगत व्यक्तींनाही उलगडत नाही. मग माझी काय कथा? हे लक्षात घेऊन कृपाळू असलेल्या समर्थ सद्गुरुंनी तो माझ्याकडून लिहून घेतला. त्यासाठी जनार्दनस्वामिंनी आधी माझे मी पण नाहीसे केले आणि मग माझ्याकडून पारमार्थिक निरुपण लिहून घेतले. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ बघताना लोकांना मोठी मजा वाटते पण त्यामागे असलेला त्यांच्या सूत्रधाराचा हात लोकांना दिसत नसतो. त्याप्रमाणे ह्या ग्रंथाची महती लोकांना फार वाटते परंतु त्यामागे तो लिहविता असलेल्या श्री जनार्दन महाराजांची उपस्थिती कोणाला दिसत नाही. ह्या ग्रंथाला जे महत्त्व प्राप्त झाले आहे ते केवळ सद्गुरू श्री जनार्दन महाराजांच्यामुळेच आहे. जरी लेखक म्हणून माझ्या नावे हा ग्रंथ ओळखला जात असला तरी सर्व ग्रंथ ही त्यांचीच निर्मिती असल्याने त्यांचेच नाव एकनाथ आहे असे समजले तरी चालेल. त्यांनी कौतुकाने ग्रंथकर्ता म्हणून माझे नाव घातले असले तरी ही सर्व त्यांचीच कृपा आहे आणि हेच खरे त्यांचे अतिअभिनव अलौलिक वैभव आहे. ग्रंथ पाहून सज्ञान म्हणतील एकनाथ ना, अतिशय ज्ञानी मनुष्य आहे पण जेव्हा ग्रंथ जवळून पाहतील तेव्हा त्यांच्या वस्तुस्थिती लक्षात येईल आणि म्हणतील आपण उगीचच एकनाथाच्या ज्ञानीपणाला भुललो, हे तर सर्व श्री जनार्दन महाराजांचे काम आहे. ग्रंथ बघून गैरसमज झालेले वाचक मला भला भक्त म्हणतील, कुणी जीवनमुक्त समजतील परंतु प्रत्यक्षात मला आसने, ध्यान, मंत्र, मुद्रा, माळा जपणे, उपासकलक्षण ह्यातलं काहीच कळत नाही.

Advertisement

 

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article