महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘नाथ’ आणि ‘अनाथ’

06:30 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात निवडणूक प्रचारादरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार आहे. कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ होणार आहे, असे सूतोवाच केले आहे. यामुळे एकीकडे राजकारणाला भरते आले आहे तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यात सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली पीकहानी भरपाईची रक्कम बँका कर्जापोटी वळत्या करून घेऊ लागल्याने बळीराजा हवालदिल झाला असून आपल्याला कोणीच वाली नसल्याच्या विवंचनेने तो अनाथ असल्याचा अनुभव घेत आहे. बहुचर्चित पेनड्राईव्ह प्रकरणाची चर्चा थांबता थांबेना. खासदार मुलगा प्रज्ज्वलच्या कर्मकांडामुळे त्यांचे वडील माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना अकरा दिवस कारावास भोगावा लागला. महिलेच्या अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या रेवण्णा यांची अकरा दिवसांनंतर जामिनावर सुटका झाली आहे. सामाजिक जीवन असो किंवा राजकारण, लोकांच्या प्रश्नावर लढताना कारावास भोगण्यात गर्व असतो. आपल्या विक्षिप्त व विकारी मुलाच्या कारनाम्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबीयांना यातना भोगाव्या लागत आहेत. हे प्रकरण हाताळताना माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची दमछाक होत आहे. गेल्या आठवड्याभरात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व एच. डी. कुमारस्वामी यांच्यातील शब्दयुद्ध वाढले आहे. ‘पेनड्राईव्ह प्रकरणामागे एक मोठा मासा आहे’ असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. ‘मोठा मासा असेल तर तो पकडा’ असे आव्हान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे. हे दोन नेते व त्यांच्या कुटुंबीयातील शब्दयुद्ध सध्या तरी थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत.

Advertisement

प्रज्ज्वल पेनड्राईव्ह प्रकरणाने राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाने कर्नाटकातील राजकारण ढवळून निघाले आहे. साताऱ्यात निवडणूक प्रचारादरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार आहे. कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ होणार आहे. याचे सूतोवाच केले आहे. आजवर एखादी सत्ता उलथवून दुसरी सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपच्या प्रयत्नांना ‘ऑपरेशन कमळ’ या नावाने ओळखले जात होते. कर्नाटकात भाजपने अनेक वेळा ऑपरेशन्स राबविली आहेत. दक्षिणेतील राज्यात सर्वात आधी ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातूनच कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करता आली. त्यानंतर एकदाही पूर्ण बहुमताने भाजप सत्तेवर आला नाही. प्रत्येक वेळेला ‘ऑपरेशन’ राबवूनच सत्तेपर्यंत पोहोचावे लागले आहे. कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन एक वर्ष पूर्ण व्हायला आले. यातच लोकसभा निवडणूक निकालानंतर हे सरकार कोसळणार, अशी वक्तव्ये सुरू झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरील विधानाने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Advertisement

‘ऑपरेशन कमळ’चे सूतोवाच करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. कर्नाटकातील भाजप नेत्यांनीही लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वेळा सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही कर्नाटकात सत्ताबदल होणार, कर्नाटकातील अजित पवार कोण ठरणार? याची प्रतीक्षा करा, असे बोल काढले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मात्र काँग्रेस सरकार पाडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही. लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये कोणते पक्षीय बदल होणार, हे आताच सांगता येणार नाही, असे सांगितले आहे. 135 संख्याबळ असलेले काँग्रेस सरकार उलथवण्यासाठी भाजप-निजद युती कोणत्या थराला पोहोचणार, हे पहावे लागणार आहे. कारण पूर्ण बहुमताने स्थापन झालेली सत्ता उलथवणे सहजशक्य होणार नाही. त्यामुळेच भाजप नेत्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. मुख्यमंत्रिपदासाठी दोन बड्या नेत्यांमध्ये वाद आहे. हा वाद कोठपर्यंत पोहोचणार, हे सांगता येणार नाही, असे सांगत आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदींसह काँग्रेस नेते ‘ऑपरेशन नाथ’च्या वक्तव्यामुळे सतर्क झाले आहेत. आमचे आमदार विक्रीसाठी नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सरकार कोसळणार नाही. अशा शब्दात या दोन्ही नेत्यांनी भाजपला उत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन कमळ’ची कल्पना आल्यानेच की काय, राज्य सरकारने प्रज्ज्वल रेवण्णा पेनड्राईव्ह प्रकरणाबरोबर क्रिप्टो करन्सी प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे. दोन्ही प्रकरणांची चौकशी एसआयटीकडे आहे. क्रिप्टो करन्सी प्रकरणात तर राजकीय नेते, त्यांचे कुटुंबीय, पोलीस दलातील बडे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय आदींची नावे चर्चेत आहेत. ऑपरेशन राबविण्याची तयारी सुरू झाली की क्रिप्टो करन्सी प्रकरणात मोठी कारवाई अपेक्षित आहे. कारण या प्रकरणात काही भाजप नेते व त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग कसा आहे, हे दाखवून देण्यासाठीच काँग्रेसने एसआयटीच्या माध्यमातून तपासाला गती दिली आहे की काय, असा संशय बळावला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्तासंघर्षाला आणखी धार चढणार आहे.

राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुप्तचर खात्याचे अहवाल, राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी बांधलेले आडाखे यावरून काँग्रेसला किती जागा मिळणार, भाजप किती जागा जिंकणार याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजप आपल्याला जास्त जागा मिळतील असा दावा करु लागले आहेत. या दाव्यांबाबतची पोल 4 जून रोजीच खुलणार आहे. अनेक ठिकाणी पैजाही रंगल्या आहेत.

निकालाबाबत उत्सुकता एकीकडे वाढली असताना दुसरीकडे बेळगावसह कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना वादळी वारा व अवकाळीमुळे आणखी त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक जिल्ह्यात सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली पीकहानी भरपाईची रक्कम बँका कर्जापोटी वळत्या करून घेऊ लागल्या आहेत. पावसाअभावी बळीराजा पूर्णपणे संकटात आहे. चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना छळू नका, अशी स्पष्ट सूचना राज्य सरकारने देऊनही पीकहानीची रक्कम बँका  कर्जापोटी जमा करून घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सरकारवर टीका होऊ लागली आहे. प्रज्ज्वल रेवण्णा पेनड्राईव्ह प्रकरण, क्रिप्टो करन्सी आदी प्रकरणांमुळे नुकसानभरपाई रक्कम बँकांनी वळती करून घेण्याच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. एफआयआर दाखल होऊन वीस दिवस उलटले तरी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाचा थांगपत्ता नाही. ते परदेशातून बेंगळूरला परतल्यानंतरच या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी या दोन प्रकरणांपुढे इतर गंभीर समस्या गौण ठरल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article