नॅट सिव्हर ब्रंटच्या मानांकनात सुधारणा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयसीसीची महिलांची टी-20 ताजी मानांकन यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये इंग्लंडच्या अष्टपैलु नॅट सिव्हर ब्रंटच्या मानांकनात चांगलीच सुधारणा झाली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या मालिकेत नाईटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या महिला संघाची कामगिरी निश्चितच समाधानकारक झाली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने द. आफ्रिकेचा पराभ्घ्व केला. या सामन्यात नॅट सिव्हेर ब्रंटने 59 धावांची खेळी करत सामनावीराचा बहुमान मिळविला. या कामगिरीमुळे तिचे टी-20 च्या ताज्या फलंदाजांच्या मानांकनातील स्थान 2 अंकांनी वधारले असून ती आता 14 व्या स्थानावर आहे. इंग्लंडची अॅमी जोन्स 29 व्या स्थानावर आहे. मात्र टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि ताहीला मॅकग्रा यांनी मात्र अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळविले असून द. आफ्रिकेची वूलव्हर्ट तिसऱ्या स्थानावर आहे. महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडची सोफी इक्लेस्टोनने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे.