नर्मदा राजूचे नेमबाजीत सुवर्णपदक
कर्नाटकाच्या जॉनचे सायकलिंगमध्ये सुवर्ण
वृत्तसंस्था / डेहराडून
येथे सुरू असलेल्या 2025 च्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तामिळनाडूची महिला नेमबाज नर्मदा नितीन राजूने अव्वल प्रतिस्पर्धी रमिता जिंदाल आणि इलाव्हेनील व्हॅलेरव्हेन यांना मागे टाकत महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत कर्नाटकाचा नवीन थॉमस जॉन आणि महाराष्ट्राची पूजा बाबन दाणोले यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या रोड सायकलिंग प्रकारात सुवर्ण पदके मिळविली.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत तामिळनाडूच्या नर्मदा नितीन राजूने 254.4 गुणासह सुवर्ण पदक तर महाराष्ट्राच्या आर्या बोर्सेने 252.5 गुणासह रौप्य आणि रमिता जिंदालने 230.4 गुणासह कास्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात नर्मदाने ऑलिम्पिक नेमबाज अपूर्वी चंडेलाचा 2019 साली नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 252.9 गुणांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. 23 वर्षीय नर्मदाने 2023 च्या कैरोमध्ये झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रुद्रांश पाटील समवेत सुवर्णपदक मिळविले होते.
या स्पर्धेत पुरुषांच्या रोड सायकलिंगमध्ये कर्नाटकाच्या नवीन थॉमस जॉनने सुवर्णपदक पटकाविले तर महिलांच्या विभागात महाराष्ट्राच्या पूजा दाणोलेने सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या रोड सायकलिंगमध्ये सेनादलाच्या दिनेशकुमारने रौप्य तर पंजाबच्या हर्षवीर सिंगने कास्पदक मिळविले. महिलांच्या रोडसायकलिंगमध्ये राजस्थानच्या मोनिका जाटने रौप्य तर कर्नाटकाच्या मेघा गोगाडने कास्यपदक मिळविले.