इस्रायल पंतप्रधानांशी नरेंद्र मोदींची चर्चा
भारत शांततेसाठी वचनबद्ध : जगात दहशतवादाला स्थान नसल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून दिली आहे. भारत शांततेसाठी कटिबद्ध असून जगात दहशतवादाला स्थान नाही, असे प्रतिपादन त्यांनी या चर्चेदरम्यान केले. 27 सप्टेंबर रोजी इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाहचा खात्मा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू यांना फोन करून त्यांच्याकडून पश्चिम आशियातील सुरू असलेल्या अशांततेची माहिती घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली पंतप्रधानांशी बोलल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली. पश्चिम आशियामध्ये घडणाऱ्या अलीकडच्या घडामोडींवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जगात दहशतवादाला मोकळीक देणे योग्य नाही. परिसरातील तणाव रोखणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे’, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.