सीमावर्ती भागात तपासणी नाक्यावर नार्कोटिक्स श्वान पथकाव्दारे तपासणी
कोल्हापूर :
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सोलापूर ग्रामीण या तीन जिह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेशी असून, राज्य विधानसभेच्या निवडणूक काळात परराज्यातून अवैध वस्तुच्या तस्करी रोखण्यासाठी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर (ग्रामीण) या तीन जिह्याच्या सीमावर्ती भागात 36 सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच परराज्यातून या तीन जिह्यात येणारा गांजा, ड्रग्ज यासारखे अंमली पदार्थ पकडण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर पहिल्यादांच नार्कोटिक्स श्वान पथकाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बुधवारी दुपारी दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कर्नाटक राज्यातील बेळगावचे पोलीस महानिरीक्षक, कलबुर्गीचे पोलीस उपमहानिरीक्षक, बेळगावचे पोलीस अधीक्षक, बिदरचे पोलीस अधीक्षक, कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक आणि विजापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर सीमा समन्वय बैठक घेण्यात आली. तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली सोलापूर (ग्रामीण) या तीन जिह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेशी असून, कोल्हापूर जिह्यातील कागल व शिवनाकवाडी, सांगली जिह्यातील म्हैशाळ आणि सोलापूर (ग्रामीण) जिह्यातील कात्राळ या चार आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांना अचानक भेटी देण्यात आली आहे. या सीमानाक्यावरील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना व बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे सांगितले. या सर्व नाक्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), जीएसटी, वन विभाग, दाऊ उत्पादन शुल्क या विभागाचे अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक ही तैनात करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभावी छापा कारवाई, प्रभावी व गुणात्मक प्रतिबंधक कारवाई, उपद्रवी घटकांवर कायदेशीर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोबिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रुट मार्च या सारख्या कारवाई करण्यात येत आहेत. विशेष निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. ही निवडणूक नि:पक्षपाती, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाकडून पुर्ण उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली.