अमलीपदार्थांची लावली विल्हेवाट
गांजा, हेरॉईन, हशिशचा समावेश : 57 लाखांहून अधिक किंमत
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील विविध पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात जप्त करण्यात आलेले 57 लाख 78 हजार 900 रुपये किमतीचे 38 किलो 197 ग्रॅम 28 मिली अमलीपदार्थ गुरुवारी नष्ट करण्यात आले.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवार दि. 25 जून रोजी सकाळी सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प येथील दि बेळगाव ग्रीन एन्व्हिरॉनमेंट मॅनेजमेंट प्रा. लि. या कारखान्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. 24 किलो 131 ग्रॅम 45 मिली गांजा, 120 ग्रॅम 83 मिली हेरॉईन, 13 किलो 945 ग्रॅम हशिश असे एकूण 38 किलो 197 ग्रॅम 28 मिली अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. तत्सम प्राधिकरणाची परवानगी घेऊन गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या चिमणीत अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले.
पंधरा प्रकरणात गांजा, आठ प्रकरणात हेरॉईन व एका प्रकरणात हशिश जप्त करण्यात आले होते. एकूण 24 प्रकरणात जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ अधिकाऱ्यांनी नष्ट केले. न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध खात्यांच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली.