Narayan Rane : आधी काम करा, पदे आपोआप मिळतील, राणेंचा रोख नेमका कुणावर?
खासदार असेपर्यंत कुणाची ढवळाढवळ नको : खासदार नारायण राणे
चिपळूण : मी खासदार असेपर्यंत इथं कुणालाही ढवळाढवळ करू देणार नाही. कोणाला माझी तक्रार करायची असेल तर बिनधास्त करा, मला त्याची फिकीर नाही. आम्हांला विचारुनच येथे नेमणुका व्हायला हव्यात. पक्ष हितासाठी मी यापुढेही बोलणारच, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी शनिवारी येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर नाव न घेता भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला असलेली कमी उपस्थिती, पक्षांतर्गत झालेल्या नेमणुकांवरून पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत व्यक्त केलेली उघड नाराजी यावरून खासदार राणे यांनी आपल्या मार्गदर्शनात पक्षांतर्गत नेतेमंडळींवर निशाणा साधतानाच कार्यकर्त्यांचाही चांगलाच समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.
ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्याला कुठलीही पदे भांडून मिळत नाहीत. त्यासाठी काम करावं लागतं, पक्ष वाढवण्यात सक्रिय सहभाग असावा लागतो. पक्ष वाढला आणि त्यातून यश मिळालं की, आपोआप सन्मानही वाढतो. त्यामुळे प्रथम काम करून दाखवा, पदे आपोआप मिळतील. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय आयुष्यात कुठलीही पदे मागितलेली नाहीत.
ती माझ्या कर्तृत्वाने आपोआप मिळत गेली. मी काल-परवा राजकारणात आलेलो नाही. 18 व्या वर्षी शिवसेनेत काम करताना इर्षेने काम केले. मी जिथे आहे, तिथे शंभर टक्के काम करतो. पक्षाला सुरुंग लावण्यापेक्षा तो मजबूत होईल, याकडे लक्ष द्या.
आपल्या पाठी किती लोक आहेत, याचाही कार्यकर्त्यांनी शोध घ्यावा. हा मेळावा भांडणे ऐकण्यासाठी नाही आणि मला तर त्यासाठी वेळही नाही. लोकसभेत मते का कमी मिळाली आणि पुढच्या निवडणुकीत ती कशी वाढतील, याचा निर्धार करणारा कार्यकर्ता हवा आहे. त्यामुळे मतभेद असले तरी ते बाजूला सारुन पक्ष वाढवा.
येणाऱ्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. चिपळूण शहराचे प्रश्न हाती घेतले आहेत. जिल्हा प्रशासनालाही सूचना केल्या आहेत. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष होईल, यादृष्टीने लोकसेवक म्हणून कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहनही राणे यांनी केले.
या मेळाव्यात चित्रा चव्हाण यांच्या पाठोपाठ परिमल भोसले यांनी कार्यकर्त्यांच्यावतीने व्यथा मांडताना सांगितले, आम्हांला राणे समर्थक म्हणून बाजूला ठेवले जाते. कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. नेमणुकांमध्ये डावलले जाते.
शहराध्यक्ष पदासाठी 13 जणांचे अर्ज आले असता एकाचीही मुलाखत न घेता ‘उबाठा’तून एकटेच आलेल्या आणि ज्यांचे दगड कार्यकर्त्यांनी खाल्ले, त्या शशिकांत मोदींची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत चर्चा करुनही आम्हांला निवडीत विश्वासात घेतले गेले नसल्याची तक्रार केली. विजय चितळे यांनी पूररेषेसह उपाययोजनांकडे लक्ष वेधले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी विकासकामांना निधी मिळत नाही. पालकमंत्री उदय सामंत हे केवळ त्यांच्या पक्षातील लोकांनाच विकास निधी देत असल्याचा मुद्दा मांडला. जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पक्षांतर्गत आढावा घेतला.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी चिपळूण-कराड या रखडलेल्या मार्गासह रेल्वेचे प्रश्न मांडले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद भूरण, विनोद म्हस्के, रुपेश कदम, प्रमोद अधटराव, रामदास राणे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.