नारायण महाराजांनी आत्मज्ञान दिले : कोंढाळकर
भुईंज :
सद्गुरु नारायण महाराज यांनी जे आत्मज्ञान दिले आणि ते ज्याला उमगले त्याचे जीवन पावन झाले. त्यांनी माणसातील माणूस घडवण्यासाठी केलेल्या कार्यातून अनेकांच्या जीवनाचे सोने झाले असून त्यांचे हे कार्य चिरंतन आहे, असे प्रतिपादन अण्णा महाराजांचे शिष्य आणि किर्तनकार हभप पंढरीनाथ कोंढाळकर यांनी भुईंज येथे केले.
कोंढाळकर म्हणाले, सद्गुरूंनी स्थापन केलेल्या या पुण्यभूमीमध्ये त्यांच्या विचारांचा जागर करण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे. हा उपक्रम राबवणारे, त्यासाठी परिश्रम घेणारे बंधू, भगिनी ही खरी सद्गुरूंची लेकरं आहेत. अशा लेकरांवर सद्गुरूंची कृपादृष्टी कायम राहील. कारण हे काम निस्पृह वृत्तीने चालवलेले कार्य आहे. उलट जे दिखावा करतात ते जर कधी अण्णांच्या सानिध्यात आले तर त्यांना अण्णा कसा प्रसाद देत असत, कसे सुनावत असत हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांना सर्व माहिती असते. त्यामुळे भुईंजच्या मठावर सुरू असलेली ही भक्ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल.
यावेळी उपसरपंच शुभम पवार, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे जगन्नाथ दगडे, भुईंज प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी,संस्थापक जयवंत पिसाळ, दत्त सेवेकरी मंडळाचे संजय शिंदे, अतुल भोसले, आनंद जाधवराव आदींनी त्यांचे स्वागत केले. प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी आभार मानले संजय भोसले पाटील यांनी सूत्रसंचालन केले