Raksha Bandhan 2025: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनातून भावाचा जिव्हाळा आणि भावनिक आधार
कोकण किनारपट्टीवरती नारळी पौर्णिमा हा एखाद्या मोठ्या सणाचा दिवस
By : प्रसन्न मालेकर
कोल्हापूर : श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा दिवस. नाना प्रकारची व्रतं यानिमित्ताने या महिन्यामध्ये होत असतात. अशामध्ये श्रावण पौर्णिमा हा सर्वच लोकांसाठी आनंदाचा दिवस, कारण हा दिवस साजरा होतो तो रक्षाबंधन म्हणून. नारळी पौर्णिमा असेही या दिवसाचे नाव आहे. कोकण किनारपट्टीवरती नारळी पौर्णिमा हा एखाद्या मोठ्या सणाचा दिवस मानला जातो.
साधारणपणे रोहिणी नक्षत्राच्या शेवटी थांबलेली मासेमारी ज्या दिवसानंतर पुन्हा सुरु होते तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमा. कोळी बांधवांची उपजिविका ज्या ही अफाट रत्नाकर समुद्रावरती अवलंबून असते. त्या पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी कृतज्ञतापूर्वक व विधीनुसार श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करणे हा नारळी पौर्णिमेचा मुख्य विधी असतो.
मुळातच श्रद्धावान व भाविक असलेला कोळी समाज हा आपल्या अन्नदात्याचे आभार मानावे. त्याच्यामुळेच अनेक कोळी बांधवांचे कुटुंब जगत असते. यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, यासाठी मोठ्या थाटाने हा नारळी पौर्णिमा सण साजरा करत असतो. यावेळी कोळीवाड्यावर विविध कार्यक्रम तसेच गोड-धोडाचे जेवण करुन सर्वांना आनंदाने तृप्त केले जाते.
तसेच साधारणपणे दोन महिने उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेचा दिवस झुलन पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मथुरा वृंदावनात भगवान श्रीकृष्ण झोपाळ्यावर बसून झोके घेतात व गोवळण राधिका सुमधूर गाणे गाऊन त्याचे मन वेधून घेत असतात.
त्यामुळे या दिवसाचा एक आगळा प्रेम, माया रुपातला पैलू या ठिकाणी पाहायला मिळत असतो. तसेच श्रावण म्हटले की, महादेवाचे महत्व आलेच. याच दिवशी प्रसिद्ध अमरनाथ गुफेमध्ये पवित्र छडीचे पूजन होऊन यात्रा संपन्न झाल्याचे सांगण्यात येते. या ना अनेक प्रकारांनी श्रावण पौर्णिमेचा दिवस हा व्रतराज असलेल्या श्रावण महिन्याच्या मध्यावर येणारा महत्त्वाचा दिवस आहे.
यामुळे कुळधर्म कुळाचार यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले सर्वत्र दिसून येते. अखंड भारतभरामध्ये या दिवशी वेगवेगळे सोहळे साजरे होत असतात. द्विज म्हणजे उपनयन अर्थात मुंज झालेला समुदाय हा श्रावणीच्या सोहळ्यामध्ये मग्न असतो. श्रावणी म्हणजे उपासकर्म. या दिवशी अंगावर असलेली जानवी बदलली जातात. लोकपरंपरेत या दिवसाला पोवती पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं.
पोवतं म्हणजे पवित्रक. या पवित्रकाला हातावर बांधून घेण्यासाठी गाव गाड्यांमध्ये गावातल्या ब्राह्मण गुरव किंवा जंगम मंडळींकडे मोठी गर्दी झालेली असते. याच दिवशी देवांना देखील पोवती अर्पण केली जातात. श्रावणी पवित्रार्पण हा विधी वर्षातला विधी मानला जातो. कारण या पवित्रार्पणामुळे वर्षभराच्या पूजेचे फळ मिळते, अशी समजूत आहे.
रक्षाबंधनातून भावाचा जिव्हाळा आणि भावनिक आधार
उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असलेले रक्षाबंधन आता संपूर्ण भारतभर पसरले आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षण करून रक्षाबंधन करतात, म्हणजे राखी बांधतात. पूर्वी युद्धाला मोहिमेवर जाण्यापूर्वी राजाचा उपाध्याय राजाला रक्षासूत्र बांधत असे कालांतराने हीच पद्धत रक्षाबंधन म्हणून रूढ झाली. साधा रेशमी दोरा कलात्मकतेन सजला आणि त्याला राखीचं रुप प्राप्त झालं.
वर्षभरातल्या या एका दिवसासाठी राखीची मोठी बाजारपेठ संपूर्ण देशभर उभी राहते. हेही या सणाचे एक वैशिष्ट्याच म्हणावे लागेल. आधी म्हटल्याप्रमाणे राजाला रक्षासूत्र बांधण्यासाठी विधिवत मुहूर्त दिला आहे. पण, त्या मुहूर्ताचे बंधन बहिणीने भावाला राखी बांधताना पाळावे लागत नाही.
त्यामुळे नात्यांना दृढ करणाऱ्या या सणाला साजरे करताना मुहूर्त कुमुहूर्त अशा शंका बाजूला ठेवून प्रेमाने व आनंदात हा सण साजरा करावा हेच महत्त्वाचे ठरते. याच निमित्ताने ओवाळणी म्हणून भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देत असतात कुठल्याही बहिणीला भावाने दिलेल्या भेटीच्या किमतीपेक्षा त्या वस्तूच्या मागं असलेला भावाचा जिव्हाळा आणि भावनिक आधार महत्त्वाचा असतो.
भावनांवरून वस्तूचे मोल जाणावे हेच उत्तम ठरेल. बंद झालेली मासेमारी आता पुन्हा सुरू होणार याचा आनंदही या सणाला जोडला गेला आहे. समुद्रात केलेली नारळ पूजा म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही तर त्यामागे अनेक भावभावनांचे मिश्रण जोडले गेले आहे.
वर्षभर आपली उपजीविका चालवणारा समुद्र म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता, पावसाळ्यामध्ये त्याच्या पाहिलेल्या खवळलेल्या रुपाला शांत होण्याची केलेली विनंती आणि मच्छीमार भगिनींसाठी वर्षातले दहा महिने त्यांच्या पिता-पुत्र, बंधू, पती यांना अंगा-खांद्यावर खेळवणाऱ्या समुद्राला आपल्या आप्तेष्टांची काळजी घेण्याची केलेली विनंती, अशा अनेक भावना यामध्ये दाटून आलेल्या असतात. त्यामुळे या दिवसाला एक कोळी बांधवाच्यामध्ये एक आगळं वेगळं महत्व असल्याचे दिसून येते. अगदी दसरा दिवाळी सारखे महत्व या सणाला असते.