नरा लोकेश यांचा आयोगाला पाठिंबा
मतदार सूची स्वच्छ करण्याचे अभियान आवश्यकच
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंध्र प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नरा लोकेश यांनी एसआयआर संबंधात केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन केले आहे. एसआयआर व्यवस्था पूर्णत: निर्दोष आहे असे म्हणता येत नसले, तरीही या व्यवस्थेचा उद्देश योग्य आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळली जात आहे. काही अडचणी असल्या, तरी ही प्रक्रियाच चुकीची आहे, असे म्हणणे अनाठायी आहे, अशी टीका त्यांनी मुलाखतीच्या एका कार्यक्रमात विरोधी पक्षांवर केलेली आहे.
विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदत्याग करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसंबंधी त्यांना मुलाखतीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. आमच्या पक्षानेही निवडणूक आयोगाकडून काही स्पष्टीकरण मागितले आहे. सत्तेत असताना आणि विरोधी पक्षात असतानाही आम्ही काही मुद्दे उपस्थित केले होते. एसआयआर व्यवस्थेत काही त्रुटी आहेत. तथापि, केंद्रीय निवडणूक आयोग या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न मनापासून करत आहे, असे दिसून येत आहे. आंध्र प्रदेशात 92 टक्के मतदारांच्या मॅपिंगचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण झालेले आहे. त्यात कोणतीही अडचण आलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा लाभ व्हावा, म्हणून काम करीत आहे, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप नरा लोकेश यांनी पूर्णत: फेटाळला आहे.
स्वत:ला बळकट करावे
आपल्या पराभवाची कारणे निवडणूक आयोगात शोधण्यापेक्षा विरोधी पक्षांनी स्वत:ला बळकट करावे. त्यांनी मतदान केंद्र पातळीपासून स्वत:ची संघटना बांधावी. तसेच त्यांनी त्यांचे मतदार मतदारसूचीत समाविष्ट होतील, यासाठी काम करुन त्यांचा समावेश सुनिश्चित करावा. केवळ टीका करुन काम भागणार नाही. विरोधकांनी त्यांची स्वत:ची परिस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
बेरोजगारी सर्वात मोठे आव्हान
बेरोजगारी हे सध्या सर्वात मोठे आव्हान आहे. विशेषत: तरुणांना बेरोजगारीची झळ पोहचत आहे. आंध्र प्रदेश सरकारने राज्यात 20 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची योजना सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. नोकऱ्यांप्रमाणेच छोटे व्यवसायही करण्याची सोय तरुणांना करुन देण्sा आवश्यक असून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आंध्र प्रदेश सरकार आयटीआय संस्थांची जोडणी उद्योगांची करीत आहे. तसेच रोजगारक्षम शिक्षणात मोठ्या प्रमाणा गुंतवणूक करीत आहे. या योजनांचे योग्य परिणाम दिसून येऊ लागले आहेत. आम्ही राज्यात 16 हजार शिक्षकांची भरती केली आहे. परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान आणि क्वांटम तंत्रज्ञान शिकून घ्यावे, यासाठी प्रयत्न होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
गुंतवणुकीला प्राधान्य
आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणूक प्रधान वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी नव्या योजना आणण्यात येत आहेत. राज्यभरात 23 गुंतवणूक क्लस्टर्स निर्माण करण्यात येत आहेत. डाटा सेंटर्स स्थापन केले जात आहेत. त्रुटी दूर केल्या जात आहेत, असे महत्वाचे प्रतिपादन लोकेश यांनी केले.