१५ वर्षांनी रंगणार नंगीवली पंजाच्या भेटीचा सोहळा; : 7 पंजांच्या भेटीतून ऋणानुबंध घट्ट करणार
पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर उद्या भेटीसाठी बाहेर पडणार
संग्राम काटकर कोल्हापूर
एकेकाळी माळावरील तालीम म्हणून आणि आता नंगीवली या नावाने कोल्हापूरात लौकिक असलेल्या तालीमचा नंगीवली पंजा येत्या रविवार 14 रोजी शहरातील पंजांना भेटी देण्यासाठी बाहेर पडत आहे. पंजाच्या प्रतिष्ठापनेच्या आजवरच्या इतिहासात हा पंजा आता दुसऱ्यांदा भेटी देत आहे. यापुर्वी 2009 साली पंजा भेटी बाहेर पडला होता. यंदाच्या पंजा भेटीतून पेठापेठांमधील तालीम, मंडळे, भाविक एकत्र येत आहेत. जेथे जेथे नंगीवली पंजा भेटी देईल तेथे तेथे पुर्वीपासून असलेला ऋणानुबंध अधिक घट्ट होणार आहे. तसेच एक आठवण म्हणून तालमीकडून भेट दिलेल्या पंजांना भरजरी फटकेही अर्पण केले जाणार आहेत.
तब्बल 135 वर्षांपूर्वी पाण्याचा खजिनाजवळच (मंगळवार पेठ) स्थापलेल्या नंगीवली तालीम आणि तालमीत मोहरममध्ये प्रतिष्ठापना केला जाणारा पंजा हिंदू-मुस्लिम एकोप्याची साक्षी देत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक ब्रिटिशांविरोधातील खलबते, अॅक्शन प्लॅन याच तालमीच करत. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या उत्तर दिशेला शिकारीला निघाले की तालमीही भेट देत होते. त्यांच्या च कृपेने अनेक मल्ल तालमीत मेहनतीसाठी येत असत. तालमीने 79 वर्षापूर्वी सुऊ केलेली मर्दानी खेळाची परंपरा नव्या पिढीने जपली आहे. अशा अनेक संदर्भांनी भारलेल्या तालमीत प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या पंजाचा इतिहासही वेगळा आहे. तालमीला लागूनच हजरत पीर नंगेशाहवली रहमतुल्लाहिअलैही दर्गा आहे. दर्ग्यात एकेकाळी हजरत पीर नंगेशाहवली या नावानेच पंजाची प्रतिष्ठापना व्हायची. कालांतराने दर्ग्यातील पंजा माळावरच्या तालमीत (नंगीवली तालीम) बसवला जाऊ लागला. हा पंजा नेमका कधी तालमीत आणला याचे संदर्भ नसल्याचे जूने-नवे कार्यकर्ते सांगताहेत. दरम्यानच्या काळात कोल्हापूरच्या मोकळ्या ढाकळ्या भाषेतून पंजाच्या नंगेशाहवली नावाचा अपभ्रंश झाला नंगीवली पंजा असे नाव जनमानसात रूढ झाले. पुढे याच नावानेच तालमीचेही नामकरण केले.
पुर्वापार परंपरेनुसार मोहरमच्या पहिल्या दिवशी बाबूजमाल दर्ग्यातील नाल्या हैदर पंजासोबत नंगीवली तालमीमध्ये नंगीवली पंजाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. पूर्वीच्या काळी लहान असलेला पंजा जशी वर्षे पुढे सरकू लागली तसे भाविकांकडून अर्पण केल्या जात राहिलेल्या भरजरी पटकांनी पंजाची उंची-जाडी वाढतच गेली. सध्या या पंजाची उंची बाराफुटापर्यंत गेली असून, घेर दोन हाताइतका झाला आहे. अशा या पंजाच्या दर्शनाला मंगळवार पेठसह शिवाजी पेठ, संभाजीनगर, पद्माळा, नाळे कॉलनी, रंकाळा परिसरातील भाविक न चुकता तालमीत येतात. भरजरी पटके अर्पण कऊन नतमस्तक होतात. पंजाला अनेक तालीम व घरगुती मानकऱ्यांचे पंजे आवर्जुन भेटी देतात. 2009 साली तालमीने नंगीवली पंजा भेटीसाठी बाहेर काढला होता. अगदीच शिस्तबद्धपणे पंजाने शहरातील पंजांना भेटी देऊन ऋणानुबंध घट्ट केला. आता पंधरा वर्षांनी पुन्हा पंजा भेटीसाठी बाहेर येत आहे. तालीम संस्थासह भाविकांनी भेटीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन तालमीने केले आहे.
पारंपरिक वाद्यांचाच होणार दणदणाट...
नंगीवली पंजा दुपारी 4 वाजता भेटीसाठी तालमीतून बाहेर काढला जाईल. भेटीच्या या सोहळ्यात साऊंड सिस्टीमऐवजी केवळ पारंपरिक वाद्ये असतील. सहा तासांहून अधिक काळ भेटी सोहळा सुऊ राहील. यामध्ये जुन्या शाहू बँकेजवळील राजेबागस्वार दर्गा, दवाल मलिक तुरबत, बाराईमाम तालीम, घुडणपीर दर्गा, जुना राजवाड्यातील वाळव्याची स्वारी, बाबूजमाल तालीम व अवचितपीर तालीमला भेटी देऊन तेथील पंजांना भेट घडवून आणली जाणार आहे.
प्रत्येक गुरूवारी नालेचे पुजन...
गंजीमाळ (कै.) नसीर सलदगे व रायगड कॉलनी येथील (कै.) सलिम सदलगे हे अनेक वर्षे नंगीवली पंजाचे झाड म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर नंगीवली तालीमजवळील स्वऊप कुदळे व मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळील (कै) गणेश सुभेदार हे ही काही वर्षे पंजाचे झाड म्हणून कार्यरत र]िहले. सध्या मंगळवार पेठ, देवणे गल्लीतील सत्यजित फडतारे हे झाड म्हणून कार्यरत आहे. मोहरमची सांगता झाल्यानंतर पंजाची ऐतिहासिक नाल तालमीतील काचपेटीत ठेवली जाते. या नालेचे प्रत्येक गुऊवारी विधीवत पुजन केले. या पुजनाची जबाबदारी मी स्वत: सांभाळत आहे.
सुशिल मंडलिक (रा. मंडलिक वसाहत)