For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अग्निवीर प्रशिक्षणासाठी आलेला नंदूरबारचा जवान बेपत्ता

10:53 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अग्निवीर प्रशिक्षणासाठी आलेला नंदूरबारचा जवान बेपत्ता
Advertisement

बेळगाव : कॅम्प येथील मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंग बटालियनमध्ये अग्निवीर प्रशिक्षणासाठी आलेला नंदूरबार जिल्ह्यातील एक जवान आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. यासंबंधी लष्करी अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलिसात फिर्याद दिली असून, पोलीस शोध घेत आहेत. हेमंत कैलास धनगर (वय 22) रा. वैनदाणे, जि. नंदूरबार असे त्याचे नाव आहे. 1 मे 2024 रोजी अग्निवीरसाठी त्याची भरती झाली आहे. सध्या मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याचे प्रशिक्षण सुरू होते. 13 जून 2024 रोजी रात्री 9 वा. रोलकॉलच्यावेळी तो हजर होता.

Advertisement

14 जूनच्या मध्यरात्री 2 पर्यंत त्याची बराक पेट्रोलिंगवर नियुक्ती होती. त्यालाही तो हजर होता. त्याच दिवशी पहाटे 4 पासून बेपत्ता झाला आहे. सर्वत्र शोध घेऊन दि. 14 जून रोजी नवनाथ  जाधव या हवालदाराने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसात एफआयआर दाखल  आहे. 170 सें.मी. उंची, गोल चेहरा, सरळ नाक, गहू वर्ण असे त्याचे वर्णन आहे. हेमंत मराठी, हिंदी बोलतो. लष्करी तळावरून बाहेर पडताना त्याने आपल्या अंगावर पांढरे शर्ट व काळी पँट परिधान केली आहे. या जवानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोनही बंद आहे. त्याच्याविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405234 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
Tags :

.