Nandani Elephant Verdict: नांदणीतील महादेवी हत्तीणीला साश्रूपूर्ण वातावरणात निरोप
हत्तीण आता गुजरातमधील वनतारा केंद्राकडे रवाना झाली
इचलकरंजी : नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तीणीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयानंतर साश्रूपूर्ण वातावरणात मिरवणुकीने गावात 33 वर्षे वास्तव्यास असलेल्या महादेवी हत्तीणीला ग्रामस्थांनी निरोप दिला. ही हत्तीण आता गुजरातमधील वनतारा केंद्राकडे रवाना झाली.
नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाला तब्बल 1300 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे. मठामध्ये हत्ती पाळण्याची परंपरा प्राचीनच आहे. सध्या असलेली महादेवी हत्तीण 1992 मध्ये नांदणी येथे आणली होती. गेल्या पाच वर्षात या ठिकाणी असलेल्या महादेवी हत्तीण बाबत न्यायालयीन लढाई सुरू होती.
याबाबत उच्च न्यायालयाने नांदणी येथील महादेवी हत्तीणीला गुजरात येथील राधाकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या जामनगर येथील विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार वनखात्याच्या वाहनासह पथक गेल्या पाच-सहा दिवसांपासून सांगली जिह्याच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलजवळ येऊन थांबले होते.
यामुळे सर्वच समाजातील नागरिकांत रोष निर्माण झाला होता. याबाबत नांदणी येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून या याचिकेचा निर्णय लागत्याशिवाय हत्तीणीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली होती.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु सायंकाळी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. हत्तीणीला नांदणी मठात ठेवण्याची मागणी फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समजताच नांदणी मठात मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला. आपली जी न्यायव्यवस्था आहे त्याचा आपण
सन्मान करूया आणि न्यायालयाच्या आदेश पाळून आपण हतीणीला निरोप देऊया. वाहनाचा ताफा तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी नांदणी गावात दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही वेळातच हत्तीणीला नेण्यासाठी असलेला दाखल झाले.
नेहमी मिरवणुकीत ज्या पद्धतीने हत्तीला सजवतात तशा पद्धतीने हत्तीणीला सजवून मठामध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी या हत्तीणीची पूजा करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून हत्तीणीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तिला नेण्यासाठी आलेल्या वनतारा पथकाकडे साश्रूपूर्णनयनांनी सुपूर्द करण्यात आले.
अनेकांना अश्रू अनावर
काही तरुण घोषणाबाजी करत होते. परंतु त्यांना शांत करत श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सर्वांना न्यायालयाच्या आदेशाचे आपण पालन करूया, असे आवाहन केले. यावेळी महास्वामी यांच्यासह उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले.
हत्तीणीच्या डोळ्यात पाणी
नेहमी प्रत्येक मिरवणुकीत वेगळा डौल असणाऱ्या या हत्तीणीचा आजही डौल तसाच होता. परंतु त्याला किनार मात्र निरोपाची होती. उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलेच होते, परंतु हतीणीच्या डोळ्यात आलेले पाणी अनेकांना हृदय हेलावून टाकणारे होते.