नांद्रे येथे स्वाभिमानीचा गांधीगिरी मार्ग; 4,500 रुपये दरासाठी ऊस तोडणी बंद, आंदोलन तीव्र होण्याचे संकेत
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू झालेल्या गळीत हंगामात ऊसाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एफआरपीपेक्षा अधिक, म्हणजेच प्रतिटन 4,500 रुपये दर मिळाल्याशिवाय एकही टिपरी कारखान्याला जाऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.
आज नांद्रे परिसरातील शेतात सुरू असलेल्या ऊस तोडणीच्या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना आणि वाहनांना विरोध न करता, अत्यंत शांततेच्या मार्गाने फुले देऊन व हात जोडून गांधीगिरी पद्धतीने ऊस तोडणी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या या थेट आवाहनाला शेतकरी आणि वाहतूकदारांनीही पाठिंबा दर्शवत ऊस तोडणी तात्काळ थांबवली.
यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना नांद्रे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला आणि कारखाना प्रशासनाला इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. आज आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने तोडणी बंद पाडली आहे; परंतु शासनाने आणि कारखानदारांनी लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरू आणि आंदोलन अधिक तीव्र करू.”
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नांद्रे येथील या गांधीगिरी आंदोलनामुळे परिसरातील ऊस तोडणी आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून, कारखानदारांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
