नंदगड मार्केटिंग सोसायटी निवडणूक,10 जणांची बिनविरोध निवड
12 रोजी निवडणूक : तीन जागांसाठी सहाजण रिंगणात : दहा जणांची माघार
वार्ताहर/नंदगड
नंदगड येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या दि. 12 रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 पैकी दहा जागांवर प्रत्येकी एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित तीन जागांसाठी प्रत्येकी दोन असे सहा अर्ज राहिल्याने तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या अ वर्ग सहकार संघाकडून निवडून दिल्या जाण्राया सात जागांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने या गटातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. मागासवर्गीय अ वर्गासाठीच्या एका जागेसाठी केवळ एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्या गटाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महिला राखीव दोन जागांसाठी दोन महिलांचे अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती तसेच ब वर्ग राखीवसाठी प्रत्येकी एकेक जागेसाठी दोन दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे.
बिनविरोध निवडून आलेल्यामध्ये ‘अ’ वर्ग सहकार संघ गटामधून विद्यमान चेअरमन अरविंद पाटील (नंदगड), विद्यमान संचालक श्रीशैल माटोळी (चुंचवाड), चांगाप्पा बाचोळकर (इदलहोंड), दामोदर नाकाडी (बैलूर), जोतिबा भरमप्पनावर (अवरोळी), प्रकाश गावडे (संगरगाळी), उदय पाटील (चापगाव), ‘ब’ वर्ग वैयक्तिक सदस्यांकडून मागास ‘अ’ वर्ग गटातून रफिक हलशीकर (जांभेगाळी), महिला गटातून तेजस्विनी होसमणी (खानापूर), पार्वती पाटील (कसबा नंदगड) हे बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले दहाही उमेदवार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार निवडणुकीत परिशिष्ट जाती गटातील एका जागेसाठी जितेंद्र मादार (नंदगड) विरुद्ध देवाप्पा मादार (हलशी) हे रिंगणात आहेत. तर परिशिष्ट जमाती गटातून निंगाप्पा नाईक (खानापूर) विरुद्ध निंगाप्पा तळवार (हंदूर) हे रिंगणात आहेत. ‘ब’ गटातून महारुद्रय्या हिरेमठ (इटगी) विरुद्ध रुक्माणा झुंजवाडकर (खैरवाड) रिंगणात आहेत.
निवडणुकीतून 10 जणांची माघार
निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पैकी राजेंद्र कब्बूर, ममता कब्बूर, कलाप्पा पाटील, दानप्पा चवलगी, महेश पाटील, विठ्ठल हिंडलकर, हणमंत देसाई, चांदसाब गदग, संभाजी पारिश्वाडकर, दुर्गाप्पा तळवार यांनी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपापले अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अभिवृद्धी अधिकारी शशिकला पाटील या काम पाहत आहेत.