For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाकी पाडणाऱ्यांची आगामी राजकारणात गय नाही : नंदाताई बाभुळकरांचा दम

06:19 PM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकाकी पाडणाऱ्यांची आगामी राजकारणात गय नाही   नंदाताई बाभुळकरांचा दम
Advertisement

विधानसभा निवडणुकीनंतर कानडेवाडीत पहिलाच मेळावा पार पडला

Advertisement

गडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी दिवसरात्र राबलो त्यामुळे विजय मिळाला. असे असताना त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवताना आघाडीतील काहींनी जाणीवपूर्वक मला एकाकी पाडत फसवणूक केली असा हल्ला चढवत मला एकाकी पाडणाऱ्यांची आगामी राजकारणात गय करणार नाही असा सज्जड दम शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी दिला.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांचा विधानसभा निवडणुकीनंतर कानडेवाडीत पहिलाच मेळावा पार पडला. त्यामुळे या मेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. डॉ. बाभुळकर यांनी कार्यकर्त्यांच्या भाषणांचा आढावा घेतला. आगामी सर्व निवडणुका आपला पक्ष ताकदीने लढणार असून यासाठी गरज भासेल तिथे समोरच्यांकडून मदत घेऊ असे सांगून आगामी वाटचाल स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षातील काही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका करत आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे सांगितले.

Advertisement

कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी पदे मिळाली पाहिजेत. आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर युतीची परवानगी असावी असे मत रामराज कुपेकर यांनी मांडले. उदयराव जोशी यांनी आगामी राजकीय वाटचालीत युती करा, नाही करा पण मी स्व. कुपेकर यांच्यासाठी सक्रीय रहाणार असल्याचे जाहीर केले.

माजी सभापती अमर चव्हाण यांनी निवडणुकीत संघर्ष करावाच लागणार आहे. पक्षाच्या हितासाठी कुणाचातरी हात धरुन पुढे जावे लागेल असे सुचवत आगामी निवडणुका ताकदीने लढण्याचा इशारा त्यांनी दिला. आजरा कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी पक्ष संघटन मजबूत करुन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण साऱ्यांनी लढायचे आहे असे सांगितले.

यावेळी दशरथ कुपेकर, कार्तीक कोलेकर, प्रकाश पाटील, नारायण चव्हाण, अनिल पाटील, एम. एस. तेली, शिवाजी सावंत, गणेश फाटक, राजेश पाटील- औरनाळकर, राजू पाटील, राजगोंड पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला बाळासाहेब कुपेकर, शिवप्रसाद तेली, शिवाजी माने, अशोक पाटील, बी. डी. पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीची चर्चा

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी प्रथमच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भूमिका मांडणार असल्याने या बैठकीची चर्चा होती. आजच्या बैठकीत डॉ. बाभुळकर यांनी विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील काहींनी दगा दिला याचा उघड समाचार घेतला. आगामी निवडणुकीत याचे पडसाद दिसतील असे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी त्यांनी आगामी निवडणुकीतील युतीवर मात्र भाष्य टाळले.

Advertisement
Tags :

.