For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नांदणीची 'माधुरी' सन्मानाने कोल्हापूरकडे; आज दाखल होणार

09:38 AM Sep 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
नांदणीची  माधुरी  सन्मानाने कोल्हापूरकडे  आज दाखल होणार
Advertisement

इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची लाडकी 'महादेवी' उर्फ 'माधुरी' हत्तीण अखेर गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी सन्मानाने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. सुमारे ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तिच्यासोबत असून, शुक्रवारी उशिरा माधुरी कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. माधुरीच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरकर आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

माधुरीला तिची विशेष काळजी घेतली जात नसल्याच्या कारणावरून वनतारा प्रकल्पात नेण्यात आले होते. त्यानंतर तिच्या पुनरागमनासाठी कोल्हापूरकरांनी उभारलेला लढा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळे, प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य नागरिक या लढ्यात सहभागी झाले. तब्बल ४५ किलोमीटरच्या ऐतिहासिक मूक पदयात्रेत ३० हजारांहून अधिक नागरिकांनी सहभागी होत माधुरीला नांदणीत परत आणण्याची तीव्र जनभावना व्यक्त केली होती.

समितीसमोर मठाची बाजू भक्कम
माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी कायदेशीर पातळीवरही जोरदार पाठपुरावा करण्यात आला. बुधवारी उच्चस्तरीय समितीसमोर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीत महाराष्ट्र शासन, मठ संस्थान आणि वनतारा प्रशासनाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. माधुरीच्या संगोपनासाठी मठ संस्थानने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, तिच्या आरोग्याची काळजी आणि वन्यजीव कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता याबाबत अहवाल समितीसमोर सादर करण्यात आला.

Advertisement

मठ संस्थानने माधुरीच्या पुनरागमनासाठी केलेल्या व्यवस्थेचा सर्वंकष विचार करून उच्चस्तरीय समितीने मठाचा अर्ज मंजूर केला. माधुरीच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश देतानाच, आवश्यक कायदेशीर परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून वनताराकडून मठ संस्थानकडे तिचे हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार गुरुवारी सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. माधुरीच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिचे मठ संस्थानकडे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर विशेष वाहनातून तिला कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.

पुण्यतिथी महोत्सवापूर्वी मठात आगमन
१३ सप्टेंबर रोजी परमपूज्य श्री १०८ शांतीसागरजी महाराज यांच्या ७१व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवापूर्वीच माधुरी मठात दाखल होणार आहे.

कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा विजय
माधुरीला नांदणीत परत आणण्यासाठीचा लढा केवळ एका समाजाचा किंवा संस्थेचा नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिकांनी तिच्याशी भावनिक नाते जोडत एकजुटीने आवाज उठविला, एका प्राण्यासाठीही कोल्हापूरकर किती जिव्हाळ्याने आणि संयमाने लढा देऊ शकतात, हे या आंदोलनातून दिसून आले. या जनभावनेची दखल राज्य शासनापासून दिल्लीपर्यंत घ्यावी लागली. त्यामुळे माधुरीचे पुनरागमन हा केवळ एका हत्तीणीचा परतीचा प्रवास नसून कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा, श्रद्धेचा आणि जनशक्तीचा विजय ठरला आहे.

Advertisement
Tags :

.