रवी जाधव यांना नाना तारी आदर्श समाजसेवक पुरस्कार
बांदा जनसेवा निधी पुरस्कार जाहीर
बांदा | प्रतिनिधी
बांदा येथील सेवाभावी स्व. डॉ. द. भि. खानोलकर यांच्या ‘जनसेवा निधी’ ट्रस्टचा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार कामळेवीर पूर्ण प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास अशोक गोठोसकर यांना जाहीर झाला आहे. आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार मंगेश नरेश कांबळी (अ. वि. जावडेकर विद्यालय, शिरोडा) यांना तर नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांना जाहीर झाला आहे. तात्यासाहेब नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हनुमंत विष्णू वाळके (शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव-कणकवली) यांना जाहीर झाला आहे.
विलास गोठोसकर हे ग्रामीण भागातील मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून नेहमीच विद्यार्थी विकास हे एकच ध्येय समोर ठेवून कार्यरत असतात. मंगेश कांबळी हे गावर्य अ. वि. जावडेकर विद्यालय, शिरोडा या माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवून वर्ग अध्यापनाबरोबरच विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. रवी जाधव आणि त्यांची सामाजिक बांधिलकी संघटना यांची समाजाप्रती असलेली आत्मियता आणि तळमळ तसा कठीण प्रसंगात धावून जाण्याची तत्परता या गुणांमुळेच त्यांना कै. नारायण यशवंत तथा नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ३.३० वाजता पीएम श्री केंद्रशाळा, बांदा नं. १ च्या सभागृहात होणार आहे.