For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट; घातपाताचा संशय नाही

12:17 PM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच  शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट  घातपाताचा संशय नाही
Advertisement

पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल ८ ऑक्टोबर रोजी जारी केला. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करणारा आजार यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

पणजी पोलिसांना ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पणजी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद (यूडी क्रमांक ६२/२०२६) करण्यात आली.

पाटेकर यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांबोळी येथील रुग्णालयात नेण्यात आला. तेथे पंचांच्या तसेच त्यांचे पुतणे प्रसाद पाटेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा अहवाल सादर केला.

Advertisement

पहाटे प्रकृती बिघडल्याचा संदेश

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे सुमारे २.३० वाजता कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून आपली प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. संदेशाला प्रतिसाद न मिळाल्यानंतर त्यांनी नाईक यांना दूरध्वनी करून प्रकृतीबाबत माहिती दिली.

पहाटे सुमारे ३.३० वाजता संदेश पाहिल्यानंतर अमेय नाईक तातडीने दोनापावला येथील पाटेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी पाटेकर कपडे परिधान करून सोफ्यावर बसलेले होते. त्याचदरम्यान ते बेशुद्ध झाले, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.

त्यानंतर नाईक यांनी सुरक्षारक्षकाच्या मदतीने मणिपाल रुग्णालयातून वाहनाची व्यवस्था केली. आपत्कालीन वाहन आल्यानंतर पाटेकर यांना पहाटे सुमारे ४.३० वाजता रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय नाही

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी नाना पाटेकर यांचे पुतणे प्रसाद पाटेकर आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांचे जबाब नोंदवले. दोघांनीही मृत्यूबाबत कोणताही घातपाताचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

Advertisement
Tags :

.