For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दमदार अभिनयाचा अध्याय संपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

08:20 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
दमदार अभिनयाचा अध्याय संपला  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड
Advertisement

पणजी : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

Advertisement

पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकाॅ रुग्णालयात हलविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह पुण्याला नेण्यात येणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली.

Advertisement

‘सलाम बॉम्बे!’ या 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर 1989 मधील ‘परिंदा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील ‘अण्णा’ या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

दमदार संवादफेक, प्रभावी देहबोली आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरून अभिनय करण्याची त्यांची शैली यामुळे नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक वेगळे आणि प्रभावी अभिनेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनसृष्टीने एक अष्टपैलू आणि दमदार कलाकार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.