For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाळे लिलावात कॅन्टोन्मेंटवर नामुष्की

10:46 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
गाळे लिलावात कॅन्टोन्मेंटवर नामुष्की
Advertisement

तीनवेळा प्रक्रिया राबवूनही बोलीदारांची पाठ : चौथ्यांदा होणार लिलाव

Advertisement

बेळगाव : रेल्वेस्टेशनसमोरील बसस्थानक बांधून अडीच ते तीन वर्षे होत आली तरी अद्याप येथील दुकानगाळे धूळखात पडले आहेत. बसस्थानकावर एकूण 12 दुकानगाळे असून, दुकानगाळ्यांच्या लिलावाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. भाडे कमी करूनदेखील दुकानगाळे घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने आता चौथ्यांदा लिलाव प्रक्रिया राबविण्याची नामुष्की कॅन्टोन्मेंट बोर्डवर आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड बसस्थानकाचे स्मार्ट सिटीअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणानंतर बसस्थानकाचे उद्घाटन न झाल्याने बरेच दिवस बसस्थानक बंद होते. त्यानंतर बसस्थानक सुरू झाले. परंतु, प्रवाशांची संख्या मंदावली होती. गोवा, वास्को, पणजी, कुडाळ, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, मालवण, देवगड यासह कुमठा, कारवार, दांडेली बस या बसस्थानकातून ये-जा करत होत्या. परंतु, प्रवाशांची संख्या नसल्याने बऱ्याच बस मध्यवर्ती बसस्थानकातून थेट गोगटे सर्कलमार्गे निघून जात आहेत.

डिजिटल सिग्नेचरच्या सक्तीमुळे नागरिकांची लिलाव प्रक्रियेकडे पाठ

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डने यापूर्वी दुकानगाळ्यांचे भाडे 20 हजार रुपये निश्चित केले होते. नागरिकांनी सांगूनदेखील तत्कालीन सीईओंनी भाडे कमी केले नव्हते. दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबवूनही त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर नूतन सीईओ राजीव कुमार यांनी दुकान भाडे 5 हजार रुपये करत पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविली. परंतु, त्यावेळीही तितकासा प्रतिसाद मिळू शकला नाही. प्रवाशांची रोडावलेली संख्या आणि डिजिटल सिग्नेचरची सक्ती यामुळे नागरिकांनी या लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविली.

आचारसंहिता संपताच पुन्हा लिलाव प्रक्रिया

तीनवेळा लिलाव प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने मागील अडीच वर्षापासून दुकानगाळे धूळखात पडले आहेत. दुकानगाळे खुले असल्यामुळे या ठिकाणी मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे या ठिकाणी दुकानगाळे सुरू झाल्यास अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठीची तयारी केली जात आहे.

परिवहनकडून आर्थिक कोंडी

बसस्थानकाच्या नूतनीकरणापूर्वी कर्नाटक वायव्य परिवहन मंडळाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला देखभालीसाठी निश्चित रक्कम देण्यात येत होती. बसस्थानकात शौचालय, स्वच्छतागृह, पथदीप यांची व्यवस्था करण्यासाठी ही रक्कम घेतली जात होती. परंतु, नूतनीकरणानंतर परिवहन मंडळाकडून देखभाल रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बसस्थानकात मोजक्याच बस येत असल्यामुळे देखभालीची रक्कम अद्याप देण्यात आलेली नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन अडचणीत सापडले आहे.

Advertisement
Tags :

.