For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपीच्या धर्तीवर नेमप्लेट, काँग्रेस नेतृत्व नाराज

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
युपीच्या धर्तीवर नेमप्लेट  काँग्रेस नेतृत्व नाराज
Advertisement

हिमाचल प्रदेश सरकारचा आदेश : मंत्री विक्रमादित्य यांना दिल्लीत बोलाविले : पक्षश्रेष्ठींकडून फटकार

Advertisement

वृत्तसंस्था/शिमला

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने देखील फर्मान जारी करत वेंडर्स, हॉटेलमालक, ढाबाचालकांना स्वत:चे नाव आणि ओळख नमूद करणे अनिवार्य केले आहे. बुधवारीच सुक्खू सरकारमध्ये मंत्री असलेले विक्रमादित्य सिंह यांनी याची घोषणा केली आहे. याकरता सर्व विक्रेत्यांना ओळखपत्र जारी केले जाणार आहे. या निर्णयामागे ग्राहकांसाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे कारण आहे. परंतु आता काँग्रेस नेतृत्वानेच विक्रमादित्य यांच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशात शांतता राखणे आमची जबाबदारी आहे. हिमाचलमध्ये अन्य राज्यांच्या लोकांचे स्वागत आहे, परंतु राज्याची अंतर्गत सुरक्षा राखणे आमची जबाबदारी आहे.

Advertisement

स्वच्छतेची खबरदारी घेणे सरकारची जबाबदारी आहे. फूड वेंडर्सची ओळख पटवित त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेशशी या आदेशाचे कुठलेच देणेघेणे नाही, असा दावा कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केला आहे. मंत्री विक्रमादित्य यांच्या टिप्पणीमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे समवेत गांधी परिवार नाराज असल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींनी बुधवारी रात्रीच विक्रमादित्य यांना दिल्लीत तातडीने बोलावून फटकारले आहे. तर त्यांनी हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांना या प्रकरणी माहिती दिली आहे.

 फिरत्या विक्रेत्यांना परवाना देणार

राज्याच्या मंत्र्याने सुधारणात्मक कारवाई असल्याचे स्पष्ट पेले आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर हे पाऊल उचलण्यात आलेले नाही. वैध लोकांनाच व्यवसाय करता यावा हा सरकारचा हेतू आहे. फिरत्या विक्रेत्यांना परवाने दिले जाणार असल्याचा दावा हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी केला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध

हिमाचल सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या काही अल्पसंख्याक नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आम्ही आमचे म्हणणे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार आहोत, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. हिमाचल सरकारच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते टीएस सिंहदेव यांनी म्हटले आहे.

अनोळखी लोकांचा वावर

विक्रमादित्य सिंह यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही स्वागत करतो. परंतु ते स्वत:च्या भूमिकेवर किती वेळ ठाम राहतात हे सांगता येणार नाही. हिमाचल प्रदेशच्या प्रत्येक गल्लीत असे लोक दाखल झाले आहेत, ज्यांना कुणी ओळखतच नाही. हे लोक हिमाचल प्रदेशातील नाहीत व ते स्वत:ची ओळख लपवत आहेत. याचमुळे पडताळणी व त्यांची ओळख पटविणे अत्यंत आवश्यक ठरले असल्याचे भाजप नेते व माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे.

विक्रमादित्य यांचे स्पष्टीकरण

हिमाचल प्रदेशात अलिकडे ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहता शांततेचे वातावरण निर्माण करणे आमची जबाबदारी आहे. राज्यात लोक रोजगारासाठी आले तर त्यांचे स्वागत आहे, परंतु राज्यात कायदा-सुव्यवस्था रहावी अशी आमची इच्छा आहे. सुरक्षा, स्वच्छतेच्या मुद्द्यावरही नजर ठेवावी लागेल. याचमुळे आम्ही बैठका घेत विक्रेत्यांची ओळख पटविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नसल्याचे विक्रमादित्य यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून भाजपचे अनुकरण

भाजप आणि काँग्रेसमध्ये आता फरकच शिल्लक राहिलेला नाही. भाजपकडून तर द्वेष फैलावला जातोच परंतु काँग्रेस देखील त्याचेच अनुकरण करत आहे. हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद निर्माण करविणे हेच या दोन्ही पक्षांचे काम आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस उत्तरप्रदेश मॉडेल अवलंबित असून हा प्रकार दुर्दैवी असल्याची टीका एआययुडीएफचे आमदार रफीकुल इस्लाम यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.