टिळकवाडी-अनगोळ रोडवरील नामफलक कलंडला
बेळगाव : मनपाकडून टिळकवाडी-अनगोळ रोडवर लावलेला कन्नड, इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलक मोडून पडण्याच्या स्थितीत आहे. मात्र फलकाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचबरोबर या मार्गावरील पदपथावर ठिकठिकाणी पेव्हर्स ठेवले आहेत. त्यामुळेही पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळ्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अशोक दुडगुंटी मनपा आयुक्त असताना शहरातील विविध मार्गांवर त्रिभाषेतील फलक लावण्यात आले आहेत. त्यावर गल्ली व रस्त्यांची नावे लिहिण्यात आली आहेत. मात्र सदर फलकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने विविध ठिकाणच्या फलकांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. टिळकवाडी-अनगोळ रस्त्यावर उभारलेला नामफलक पडण्याच्या स्थितीत आहे. काँक्रीट उखडल्याने फलक एका बाजूला कलंडला आहे. तरीदेखील दुर्लक्ष केले आहे. तसेच पदपथावर ठिकठिकाणी पेव्हर्स ठेवल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.