‘त्या’ मेट्रो रेल्वे स्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव द्या!
बेंगळूर : बेंगळूरमधील शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्थानकाला सेंट मेरी मेट्रो रेल्वे स्थानक हे नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने संमती दर्शविली आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सोमवारी सकाळी विधानपरिषद सदस्य डॉ. एम. जी. मुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या विनंतीची दखल घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मराठा समाजाचे नेते सुरेश साठे व इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्थानकाला सेंट मेरी नाव देण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले होते. आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी केंद्र सरकारकडे जाण्यास सांगितले. दरम्यान, मराठा समाजाचे नेते व विधानपरिषद सदस्य डॉ. एम. जी. मुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मेट्रो रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.