बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला सुरेश अंगडी यांचे नाव द्या
भाजप पदाधिकाऱ्यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवार दि. 14 रोजी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय जलशक्ती-रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी धर्मनाथ भवनाजवळील ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटना व पक्षातर्फे हाती घेणाऱ्या उपक्रमांबाबतची माहिती घेतली. कार्यकर्ते हेच भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या त्यांच्याच राज्यात लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवणे शक्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज देश प्रगतिपथावर आहे.
या भागातील रेल्वे योजनांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मंत्री सोमण्णा म्हणाले. दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बेळगाव-बेंगळूर सुपरफास्ट रेल्वेला माजी मंत्री दिवंगत सुरेश अंगडी असे नामकरण करण्याची मागणी केली. यासंबंधीचे निवेदन मंत्री सोमण्णा यांनी स्वीकारून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, मल्लिकार्जुन मादमन्नवर, जिल्हा भाजप अनुसूचित जमाती अध्यक्ष यल्लेश कोलकार, जिल्हा माध्यम प्रमुख सचिन कडी, खजिनदार संतोष देशनूर, माध्यम साहाय्यक प्रमुख बाळेश चवण्णवर, नयना भस्मे, गुरुप्रसाद कोतीन, प्रशांत अम्मीनभावी, विठ्ठल नायन्नवर, मनोज पाटील यांसह अन्य काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.