नैनार नागेंद्रन भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
तामिळनाडूत अण्णामलाई यांच्या स्थानी नियुक्ती
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत भाजपच्या नेतृत्व बदल झाला आहे. के. अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पहिल्यांदाच तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुकच्या संभाव्य आघाडीमुळे अण्णामलाई यांना राजीनामा द्यावा लागल्याचे मानले जात आहे. त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी केवळ नागेंद्रन यांचाच अर्ज दाखल झाला होता. तर अण्णामलाई यांनी यापूर्वीच आपण प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते.
नैनार नागेंद्रन हे तामिळनाडूच्या तिरुनेलवेरी क्षेत्रातील भाजपचे आमदार असून राज्याच्या राजकारणात एक अनुभवी चेहरा म्हणून ओळखले जातात. ते यापूर्वी अण्णाद्रमुकमध्ये होते आणि जयललिता सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर अण्णामलाई यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात उतरविले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचे संकेत दिले आहेत.
थेवर समुदायाशी संबंध
नागेंद्रन यांचा संबंध तामिळनाडूच्या प्रभावशाली थेवर समुदायाशी आहे. सद्यकाळात भाजप आणि अण्णाद्रमुक दोघांचे प्रमुख नेते के. अण्णामलाई आणि ई. पलानिस्वामी हे गौंडर समुदायाशी संबंधित असून पश्चिम तामिळनाडूत प्रभावशाली आहेत. अशा स्थितीत अन्य समुदायाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपवून जातीय संतुलन साधण्याचे आणि आघाडीची शक्यता मजबूत करण्याची इच्छा भाजप नेतृत्वाची आहे.
भाजपमध्ये भूमिका
नैनार नागेंद्रन यांनी भाजपमध्ये सामील झाल्यावर पक्षाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दक्षिण तामिळनाडूत ते पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून संघटनात्मक कार्यांमध्ये सक्रीय भूमिका बजावत असतात. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला राज्याच्या दक्षिण हिस्स्यांमध्ये मजबुती मिळण्याची शक्यता आहे. तसेच नागेंद्रन हे अण्णाद्रमुकसोबत उत्तम ताळमेळ राखू शकात. भाजप 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुकसोबत पुन्हा आघाडी निर्माण करू इच्छित आहे.