For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने साजरा

11:07 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने साजरा
Advertisement

विविध नागदेवतांच्या मंदिरांमध्ये भाविकांकडून विधिवत पूजा : दिवसभर दर्शनाचा लाभ : घरोघरी नागदेवतेची सुवासिनींकडून मनोभावे पूजा

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्यात शुक्रवारी नागपंचमी सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यात असलेल्या विविध नागदेवतांच्या मंदिरांमध्ये भाविकांनी विधीवत पूजा केली. तसेच दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतशिवारात असलेल्या वाऊळाची पूजा केली नागपंचमी सणानिमित्त गावागावातील मंदिरांमध्ये भजन व इतर अध्यात्मिक कार्यक्रम झाले. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण ग्रामीण भागातील नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. हा सण साजरा करण्याची त्या त्या गावांनुसार परंपरा आहे. त्यानुसार गावकरी मंडळी पूजा करताना दिसले. गुऊवारी सायंकाळी लोहारांकडून अथवा सुतार बंधू यांनी बनविलेल्या मातीच्या नागमूर्ती अळूच्या पानातून काही बालकांनी तसेच नागरिकांनी आपल्या घरी आणल्या. या नागमूर्तीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. नागमूर्तीला लाह्या, दूध व इतर फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

Advertisement

गावाजवळील शिवारात वारुळाची पूजा

तालुक्यात काही ठिकाणी वा मंदिरांच्या आजूबाजूला नागदेवता मूर्ती आहेत. या मूर्तींची शुक्रवारी सकाळी अभिषेक करून पूजा करण्यात आली. नागाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शुक्रवारी दिवसभर गर्दी केली होती. तालुक्यात सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामेश्वर आदी शिवस्वरूप पिंडी असलेली मंदिरे आहेत. या मंदिरांमध्येही नागपंचमीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली होती. भक्तांनी या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. जानेवाडी गावातील शेतकऱ्यांनी गावाजवळील शिवारात वारुळाची शुक्रवारी सकाळी पूजा केली. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमले होते. त्या ठिकाणी पूजा करून महाआरती करण्यात आली.

कर्ले-पिरनवाडी मंदिरांत पूजा

कर्ले येथील गावकऱ्यांनी वाऊळाची विशेष पूजा केली. यावेळी खामकर यांनी पूजाविधी पार पाडला. गावकरी पूजेसाठी जात होते. पिरनवाडी येथील बिरदेव मंदिराच्या समोर नागदेवताची मूर्ती आहे. या ठिकाणी प्रारंभी पुजारी व मंदिर कमिटीच्या वतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर पिरनवाडीसह आजूबाजूच्या परिसरातील महिला येऊन नागदेवाची पूजा करताना दिसल्या.

नागपंचमीनिमित्त फराळ बनविण्याची परंपरा

या नागपंचमीच्या सणानिमित्त ग्रामीण भागात लाह्या, चिवडा, लाडू आदी फराळ (तंबिट) बनविण्याची परंपरा आहे. हे फराळ बनविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात येऊन या साहित्याची खरेदी केली होती. तालुक्याच्या सर्रास भागात नागरिक गुऊवारी सकाळपासूनच तांबिट अर्थात लाह्या, चिवडा, लाडू बनवितानाचे चित्र पहावयास मिळाले.

पाळणा खेळण्याची-गाणी म्हणण्याची पद्धत

नागपंचमीनिमित्त पाळणा खेळण्याची प्रथा आहे.पूर्वीच्या तुलनेत दोरीचा पाळणा बांधून घेण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी मुली व महिला या पाळण्यावरून झोका खेळताना दिसून आल्या. यावेळी काही पारंपरिक गाणीसुद्धा त्या म्हणत होत्या. वाऊळाला जाऊया नागोबाला पुजूया... असे म्हणत गावागावातील महिला सामूहिक पद्धतीने वाऊळाकडे जाऊन नागदेवताची पूजा करताना दिसून आल्या. काहीजणांनी नागपंचमीनिमित्त शुक्रवारी उपवास केला होता. तर रात्री नागदेवताला नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडला. शुक्रवारी बऱ्याच गावातील मंदिरांमध्ये भजन व प्रवचनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.