Satara News : तरुण भारत’ वृत्तानंतर नगरपंचायत जागी; पाटणमध्ये तातडीने स्वच्छता मोहीम
पाटणमध्ये नालेसफाई मोहीम; नागरिकांमध्ये समाधान
पाटण : 'पाटणमध्ये नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर' या मथळ्याखाली 'तरुण भारत'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर नगरपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली. शहरात तुंबलेल्या नालेसफाईची मोहीम नगरपंचायतीने हाती घेत तत्काळ नालेसफाई केली. त्यामुळे शहरातील नागरिक 'तरुण भारत'ला धन्यवाद देत आहेत.गेले अनेक दिवसांपासून नालेसफाईची समस्या उग्र झाली होती.
अनेक प्रभागातील नागरिकांनी अनेकदा नगरपंचायतीला या गैरसोईबाबत लेखी, तोंडी तक्रारी देऊन देखील परिस्थिती 'जैसे थे' होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. काही वेळा घाण नाल्यातून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण येत होती. याबाबत 'तरुण भारत'ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर तातडीने नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी नालेसफाईची मोहीम हाती घेतली व अनेक प्रभागातील नाल्यांची स्वच्छता केली. दरम्यान, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.