अतिक्रमण केलेल्या दुकानांवर नगरपंचायतीकडून हातोडा
खानापुरात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र : तालुका पंचायतीचे 30 गाळे जमिनदोस्त : धडक कारवाईमुळे नागरिकांतून समाधान
खानापूर : येथील राजा शिवछत्रपती चौक ते मऱ्याम्मा देवी मंदिरापर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपंचायतीने गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरुवात केली होती. मात्र गुरुवारी व्यापारी संघटनेने बंद पुकारला होता. त्यामुळे ही मोहीम स्थगित होती. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता नगरपंचायतीने शिवस्मारक चौकातील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, महसूल अधिकारी गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, राजू जांबोटी व कर्मचारी तसेच सफाई विभागाचे सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सर्व दबाव झुगारुन राजा छत्रपती चौकाच्या रस्त्याच्या बाजूला तालुका पंचायतीचे एकूण 30 गाळे जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
शहरांतर्गत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र आराखड्यानुसार काम होत नसल्याने माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी दि. 13 जानेवारी रोजी उपोषण केले. होते. या उपोषणाची दखल घेत तहसीलदारांनी रस्त्याचे सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र राजा शिवछत्रपती चौकातील तालुका पंचायतीच्या गाळ्यातील भाडेकरुनी अतिक्रमण हटवण्याच्या विरोधात राजकीय दबावाचा वापर सुरू केला होता. तहसीलदार आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटावबाबत कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात केली. राजकीय दबाव आणून अतिक्रमण तसेच ठेवण्यासाठी प्रयत्न चालले होते. मात्र दिनकर मरगाळे, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, सुरेश जाधव, यशवंत बिरजे, प्रकाश देशपांडे, नारायण काटगाळकर, तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेणे भाग पडले.
अतिक्रमण हटवल्याने रस्ता 75 फुट रुंद होणार
शुक्रवारी सकाळी राजा छत्रपती चौकात नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी जेसीबी व अतिक्रमण हटवण्याच्या साहित्यासह उपस्थित राहिले. गाळेधारकांनी शेवटपर्यंत विरोध केला. मात्र अधिकाऱ्यांनी विरोधाला न जुमानता तसेच राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. शेवटी गाळेधारकांनी आपले साहित्य स्वत:हून काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र स्वीट मार्ट चालकांनी आपले साहित्य गाळ्याच्या आत ढकलून बचावासाठी प्रयत्न केला. यालाही दाद न देता, अतिक्रमणावर हातोडा चालवला. यावेळी ता.पं.च्या 30 दुकानगाळ्यांवर नगरपंचायतीकडून कारवाई करण्यात आली. त्यामुळे इतर मालकानी आपणहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. शहरांतर्गत रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवल्याने आता हा रस्ता 75 फुट रुंद होणार आहे. त्यामुळे वाहतुकीस सुलभ होणार आहे. नगरपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते.
ब्लॉक काँग्रेसकडून पाठिंबा
अतिक्रमण हटवण्यासाठी दिनकर मरगाळे यांनी उपोषण केले होते. यावेळी सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. मात्र भाजपने या आंदोलनाकडे पाठ फिरविली होती. आंदोलनाच्या वेळी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी प्रत्यक्ष फोनवरुन संपर्क साधून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तहसीलदार आणि भूमापन अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून पुढील कारवाई करण्यासाठी सूचना केल्या होत्या. याबाबत काँग्रेसचे सुरेश जाधव आणि ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, ईश्वर घाडी, महांतेश राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण आणि नकाशा तयार करून घेण्यात यश मिळविले. अतिक्रमण हटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आज प्रत्यक्षात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाली.
शिवस्मारक शेजारील दुकानगाळे पाडवून जागा मोकळी करा
शिवस्मारक शेजारील असलेल्या आरसीसी दुकानगाळ्यांचे अतिक्रमण झालेला अंदाजे सात फूट भाग पाडवण्यात आला आहे. सध्या असलेले गाळेधारक याच अवस्थेत दुरुस्ती करून पुन्हा त्या ठिकाणी दुकान सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हे दुकानगाळे 40 वर्षापूर्वी बांधलेले आहेत. तसेच अतिक्रमण हटवताना या इमारतीना धोका पोहचलेला आहे. त्यामुळे हे गाळे पूर्णपणे जमिनदोस्त करून जागा पूर्णपणे मोकळी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांची आहे.
व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे दुकानगाळे देण्याची मागणी
राजा छत्रपती स्मारकाच्या बाजूने तसेच जुन्या कोर्ट आवारात तालुका पंचायतीचे दुकानगाळे आहेत. याच दुकानगाळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी नव्याने भव्य व्यापारी संकुल उभारुन शहरातील व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे दुकानगाळे भाडेतत्वावर देण्यात यावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.
टेंडर प्रक्रिया राबवून दुकानगाळे भाडेतत्वावर द्यावेत
सध्या जुन्या कोर्ट आवारात आणि शिवस्मारक शेजारी असलेल्या दुकान गाळ्यांचे भाडे थकीत आहे. ते भाडे तालुका पंचायतीने पूर्णपणे वसूल करावे, तसेच नव्याने गाळे उभारल्यास टेंडर प्रक्रिया राबवून दुकानगाळे भाडेतत्वावर देण्यात यावे, यात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून जाब विचारला जाईल, असे सुरेश जाधव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.