For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागालँडमध्ये विषारी दारूने 19 जणांचा मृत्यू; अवैध दारूच्या पुरवठ्याचा शोध सुरू

03:07 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
नागालँडमध्ये विषारी दारूने 19 जणांचा मृत्यू  अवैध दारूच्या पुरवठ्याचा शोध सुरू
Advertisement

मोकॉकचुंग (नागालँड) : नागालँडमध्ये कथित बनावट किंवा विषारी दारू प्यायल्याने गेल्या दोन दिवसांत तब्बल 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोकॉकचुंग जिल्ह्यात 8 तर तुएनसांग जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

संशयित बेकायदा दारूचा स्रोत आणि त्याच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आय. बुंगलांग चांग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित भेसळयुक्त दारूचे सेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी दारूचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी गुवाहाटी येथे पाठवण्यात आले आहेत.

Advertisement

नागालँडमध्ये 1990 पासून दारूबंदीचा कायदा लागू आहे. असे असतानाही संशयित अवैध दारूचा पुरवठा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने पोलिसांसमोर या पुरवठा साखळीचा माग काढण्याचे आव्हान आहे.

पोलिसांनी तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले आहे. मात्र, तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याबाबत अधिक माहिती देणे सध्या योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेनंतर संशयित दारूचा पुरवठा कुठून झाला, त्यामागे कोण आहे आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास SITकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.