नागल मानांकनात 233 व्या स्थानी तर बोपण्णा टॉप 50 बाहेर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एटीपीच्या पुरुष एकेरी ताज्या टेनिस मानांकनात भारताचा सुमित नागल 233 व्या स्थानावर आहे. मात्र भारताचा 45 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीच्या मानांकनात तब्बल 15 वर्षानंतर पहिल्या 50 खेळाडूंमधील स्थान गमवावे लागले आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत सुमित नागलची एटीपीच्या मानांकनात घसरण सुरूच आहे. 2023 च्या जुलैमध्ये एटीपीच्या मानांकनात 27 वर्षीय नागल 231 व्या स्थानावर होता. यानंतर नागलने एटीपी टूरवरील विविध स्पर्धांमध्ये बऱ्यापैकी कामगिरी करत 2024 च्या जुलैमध्ये या मानांकनात त्याचे स्थान 68 अंकाने वधारले होते.
पुरुष दुहेरीच्या मानांकनात भारताचा युकी भांब्री 35 व्या स्थानावर असून रोहन बोपन्ना 53 व्या स्थानावर आहे. गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत बोपण्णाने दुहेरीच्या मानांकनात पहिल्या 50 खेळाडूंमध्ये आपले स्थान राखले होते. तो आता 53 व्या स्थानावर आहे. भारताचा एन. श्रीराम बालाजी मानांकनात 72 व्यास्थानावर, ऋत्विक बोलीपल्ली 72 व्या स्थानावर, विजय सुंदर प्रशांत 100 व्या स्थानावर आहे.