For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नबीन यांच्या गोवा भेटीने भाजपात नवा उत्साह...

06:40 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
नबीन यांच्या गोवा भेटीने भाजपात नवा उत्साह
Advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा गोवा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातो. येणाऱ्या वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या पहिल्याच भेटीमुळे राज्यातील भाजपचा उत्साह दुणावला आहे. भाजपसाठी तशी प्रत्येक निवडणूक ही नियोजनबद्ध व तेवढीच उत्साही असते. 2027 मध्ये 27 जागा जिंकण्याची घोषणा त्यांनी आत्तापासून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये द्यायला सुऊवात केली आहे. बूथ पातळीपासून मंडळ स्तरावर जोरदार कार्यालाही सुरुवात झाली आहे. वेळेच्या आधी आणि कुठलीच कसर न सोडता नियोजनबद्धरित्या सर्व स्तरांवर कार्य करण्याच्या या रणनीतिमुळेच गेली पंधरा वर्षे हा पक्ष राज्यात सत्ता राखून आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी अगदी हातातून निसटलेल्या जागाही खिशात टाकण्याची किमया साधली.

Advertisement

नितीन नबीनच्या गोवा दौऱ्यानंतर विरोधी पक्षही खडबडून जागे झाले आहेत. प्रदेश काँग्रेसमध्ये हालचाली दिसत नसल्या तरी युवा काँग्रेसने काही सामाजिक मुद्दे हाती घेऊन खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनीही गोव्याला धावती भेट दिली. आरोग्य सेवेचा पंजाब मॉडेल त्यांनी गोव्यात आणला असून त्याचा पाठपुरावा म्हणून काही तालुक्यांमध्ये कार्यकर्ते व स्थानिकांसोबत बैठकाही घेतल्या. केजरीवाल यांनी या भेटीत भाजपवर निशाणा साधताना काँग्रेसलाही टीकेचे लक्ष्य बनविल्याने तूर्त युतीची शक्यता फेटाळलेली दिसते. ‘आप’ची रु. 10 लाखांची आरोग्य विमा योजना गोव्याच्या जनतेला कितपत पचनी पडेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मागील निवडणुकीत मोफत वीज व पाण्याची योजना त्यांनी गोमंतकीयांसाठी आणली होती. त्यांच्या या पहिल्या प्रयत्नात चाळीसपैकी दक्षिणेची एक जागा जिंकून पक्षाने गोव्यात पाय रोवले. सध्या गोव्यात सार्वजनिक आरोग्याची काय परिस्थिती आहे, हे आम जनताच सांगू शकेल. राज्यात इस्पितळांच्या इमारती प्रशस्त असल्या तरी तेथे वैद्यकीय सुविधा नाहीत. ज्या ग्रामीण भागात व तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांची गरज आहे, तेथे खरी वानवा आहे. त्यामुळे आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तपासण्यांसाठी काणकोणपासून सांगे व फोंडापर्यंतच्या रुग्णांवर बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त जाण्याची नामुष्की ओढवली आहे. पेडण्यातही सध्या याच विषयावर स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे. या एकंदरीत परिस्थितीत ‘आप’ची आरोग्य योजना गोवेकरांच्या प्रकृतीला कितपत मानवेल व त्याचा ‘आप’ला निवडणुकीत कितपत फायदा होईल, हेही पाहावे लागेल.

राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्याविरोधात आंदोलनेही सुरू असली तरी विरोधकांचे शेवटपर्यंत सूर जुळून येत नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत शेवटपर्यंत त्यांना हा सूर गवसला नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हातच्या जागा गमावण्याची वेळ काँग्रेससह इतर पक्षांवर आली. राजकारणात उशिरा सुचलेले शहाणपण कामी येत नाही. त्यामुळेच भाजप हा अत्यंत नियोजितपणे काम करणारा व नेहमीच काळाच्या पुढे असलेला पक्ष विरोधकांवर मात करीत आला आहे. सतत नवीन योजना, जनतेला आकर्षित करणारे त्यांचे अभिनव मुद्दे  मतदारांना वश करतात. हीच किमया गेली पंधरा वर्षे सातत्याने साधत गोव्याच्या मातीत घट्टपणे त्यांनी आपले पाय रोवले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्यावेळी सरकार विरोधात अनेक मुद्दे येतात, आंदोलने होतात, जनतेमध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोषाचे ढगही दाटून येतात पण निकालातून ते प्रकट होत नाहीत, हे आजवर विधानसभा, जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकांचे अनुभव सांगतात.

Advertisement

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना गोव्यातील जमिनी, जल आणि पर्यावरणाच्या मुद्याबरोबर अन्य विषय घेऊन काही संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हे सामाजिक विषय असले तरी ते गोव्यातील राजकारणाशी व सरकारशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तीसह अन्य काही मान्यवर मंडळींनीही गोवा राखण्याचे आवाहन करीत भाजप सरकारपुढे पेच उभा केला आहे. त्यातून राज्यातील काही ज्वलंत प्रश्नांना हात घातल्याने त्याचा थेट संबंध येणाऱ्या निवडणुकांना लागू होतो. भाजपमधील काही अंतर्विरोधी घडामोडीही या निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतात. संभाव्य उमेदवारीवरून काही ठिकाणी अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू आहे. पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान मंत्री-आमदारांपुढे तरुण उमेदवारांचे पर्याय उभे करून आपली सत्तास्थाने मजबूत करण्यासाठी आखलेली ही रणनीती आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्याची छोटीशी झलकही पाहायला मिळाली होती. हे सर्व सुरू असले तरी उमेदवारी जाहीर होईपर्यंत भाजप थांबत नाही. पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये उतरविण्याची ताकद हीच त्यांच्या विजयाची खात्री असते. विरोधकांची परिस्थिती मात्र नेमकी उलट असून उमेदवारी जाहीर होईपर्यंत, त्यांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते कायम गोंधळात सापडलेले दिसतात.

विधानसभा निवडणुकीपूर्वी फोंडा मतदारसंघात दिवंगत कृषीमंत्री स्व. रवी नाईक यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक येत्या महिन्याभरात होऊ घातली आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून उमेदवार मात्र जाहीर केलेला नाही. तरीही मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत नवमतदार संमेलने, महिला मेळावे जोरात सुरू आहेत. या उलट इतर पक्षांमध्ये अद्याप कुठलीच स्पष्टता दिसत नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार, चारसौ पार’ हा भाजपचा नारा होता. प्रत्यक्षात केवळ काठावरचा आकडा गाठता आला. त्यानंतरच्या बिहार व अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये त्यांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ही किमया साधली. गोव्यात 2027 मध्ये 27 जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे व त्याची सुरुवात 2026 मध्येच सुरू झाली आहे. ही निवडणूक एका अर्थाने सत्ताधारी भाजप व विरोधकांसाठीही निर्णायक म्हणावी लागेल. त्यापेक्षा भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तसेच गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांचीही कसोटी लावणारी आहे.

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :

.