For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैसूर नगरपालिकेचे शिष्टमंडळ बेळगाव दौर्‍यावर

12:23 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूर नगरपालिकेचे शिष्टमंडळ बेळगाव दौर्‍यावर
Advertisement

मनपाच्या कचरा व्यवस्थापनाबाबतची घेणार माहिती

Advertisement

बेळगाव : कचरा व्यवस्थापनाबाबत बेळगाव महानगरपालिका राज्यात अव्वलस्थानी आहे. त्यामुळे बेळगावात महापालिकेकडून राबविण्यात आलेली नाविन्यपूर्ण प्रणाली पाहण्यासाठी म्हैसूर जिल्ह्यातील नगरपालिकेचे शिष्टमंडळ या आठवड्यात बेळगाव दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह सांबरा एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोठेही ब्लॅकस्पॉट दिसू नये यासाठी आरोग्य निरीक्षकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना महापालिकेकडून करण्यात आली आहे.

शहरातील कचरा समस्या मार्गी लागावी, यासाठी महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्यापही म्हणावे तसे यश आले नसल्याचे दिसून येते. कारण, जिकडे तिकडे ब्लॅकस्पॉट निर्माण होत असून गल्लीबोळात पावलापावलावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणात बेळगाव अव्वलस्थानी यावे, यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण व आरोग्य विभागाकडून बेळगावकरांचा फिडबॅक घेतला जात आहे. मात्र यामध्ये नागरिकांनी रस दाखविला नसल्याने महापालिका तोंडघशी पडली आहे.

Advertisement

शहरातील कचरा तुरमुरी येथील कचरा डेपोत टाकण्यात येऊ नये, कचरा डेपो अन्यत्र हलविण्यात यावा, यासाठी दबाव वाढत चालला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरमुरी कचरा डेपोत अनेक यंत्रसामग्री बसविण्यात आल्या आहेत. मात्र, आता कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्याची शहरातील परिस्थिती पाहता स्मार्टसिटी नव्हे तर कचरा सिटी म्हणण्याची वेळ आली आहे. मनपाकडून घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे.

चार प्रकारांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे लागणार

ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दिल्यानंतरच कचऱ्याची उचल केली जाते. मात्र, आता भविष्यात चार प्रकारांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे लागणार आहे. शहरात कचरा समस्या कायम असतानाच बेळगाव महानगरपालिका राज्यात अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ कागदी घोडे नाचवून कचरा व्यवस्थापनात अव्वल् स्थान मिळवून काय उपयोग? असा सवालही केला जात आहे. त्यातच आता या आठवड्यात म्हैसूर जिल्ह्यातील नगरपालिकेचे शिष्टमंडळ बेळगावला येणार आहे.

बेळगाव मनपाकडून राबविलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण प्रणालीची त्यांच्याकडून पाहणी केली जाहणार आहे. त्यामुळे शिष्टमंडळाचे स्वागत ब्लॅकस्पॉटने होऊ नये, यासाठी महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली आहे. महामार्ग व सांबरा विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लॅकस्पॉट हटवावेत. कोणत्याही प्रकारे रस्त्याच्या कडेला कचरा दिसून नये यासाठी आरोग्य निरीक्षकांनी काळजी घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना करावी, असे मनपातर्फे सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.