तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा
हुक्केरी पोलिसांची कारवाई, क्षुल्लक कारणावरून खून, चौघांना अटक
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील मधूमकनाळ गावात घडलेल्या खून प्रकरणाचा 24 तासांत तपास लावण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गावातीलच चौघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. मधूमकनाळ गावात घडलेल्या खून प्रकरणाची माहिती देण्यासाठी मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, सोमवारी सचिन कांबळे (रा. मधूमकनाळ) या तरुणाचा खून झाल्याची फिर्याद त्याचा भाऊ शिवानंद याने हुक्केरी पोलीस स्थानकात दिली. गावापासून काही अंतरावर सचिनवर चार ते पाचजण प्राणघातक शस्त्राने हल्ला करत आहेत, अशी माहिती त्या मार्गावरून येणाऱ्या बस कंडक्टरने गावातील नागरिकांना दिली.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. सचिन याचा गावातील दोघा तरुणांशी यापूर्वी वाद झाला होता. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. फिर्यादी शिवानंद हा सेंट्रींग काम करतो. यापूर्वी त्याच्याकडे विशाल नायक, बाळगौडा पाटील हे दोघेजण कामाला होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी शिवानंदकडील काम सोडून गणेश हरिजन याच्याकडे कामासाठी जात होते. फिर्यादी शिवानंद आणि वरील दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहारदेखील झाला होता. त्यातच एका लग्न समारंभात मयत सचिन आणि विशाल नायक या दोघांमध्ये नाचण्यावरून वादावादी झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी विशाल अशोक नायक (वय 20), बाळगौडा भिमगोंडा पाटील (वय 21), गणेश चंद्रकांत हरिजन (वय 19) आणि शिवानंद पेंपण्णा घस्ती (वय 26) या चौघांची कसून चौकशी केली असता सचिनचा खून केल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी तपास हुक्केरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश बसापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.